बॉम्ब शब्द उच्चारला म्हणून एका वृद्ध दाम्पत्याला कोची विमानतळावर रोखण्यात आल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत चौकशीनंतर सोडून दिले आहे.

शनिवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास एक ६३ वर्षीय व्यक्ती पत्नीसह कोची विमानतळावर पोहोचले होते. काही वेळाने या दाम्पत्याला पोलिसांनी तपासणीसाठी बोलवले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना बॅगमध्ये काय आहे, असं दोन ते तीन वेळा विचारले. अखेर चिडून बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे उत्तर त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या घटनेची माहिती सुरक्षा रक्षकांनी नेदमबस्री पोलिसांना दिली. पोलिसांनी यानंतर दोघांनाही ताब्यात घेतले. दरम्यान, चौकशीनंतर दोघांना सोडून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मम्मन जोसेफ असं या ६३ वर्षीय वृद्धाचे नाव असून ते कोची येथील पट्टनमथीटा येथील रहिवासी आहे. ते कोच्चीवरुन ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी कोची विमानतळावर दाखल झाले होते. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या सततच्या प्रश्नांना कंटाळून त्यांनी रागात बॅगध्ये बॉम्ब असल्याचे उत्तर दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.