एका जोडप्याने आत्महत्येच्या आधी त्यांच्या मुलांना मावशीच्या घरी सोडलं आणि त्यानंतर टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. ही घटना तेलंगणामध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळली आहे. या दोघांनाही आरोग्याच्या काही तक्रारी होत्या. तसंच नैराश्य आलं होतं त्यामुळे या दोघांनीही आयुष्य संपवलं. मात्र त्याआधी त्यांनी दोन्ही मुलांना मावशीच्या घरी सोडलं होतं. तेलंगणातल्या निझामाबाद या ठिकाणी ही घटना घडली आहे.
नेमकी काय घटना काय घडली?
अयुंश आणि मिथुन या दोन्ही मुलांना हे ठाऊक नव्हतं की ते आई वडिलांना शेवटचं पाहत आहेत. या दोघांनाही त्यांच्या आई वडिलांनी मावशीकडे सोडलं. अवघ्या काही तासांमध्ये ही दोन्ही मुलं अनाथ झाली. याचं कारण त्यांच्या आई वडिलांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. तेलंगणातल्या निझामाबाद या ठिकाणी या दोघांनीही राहत्या घरी आत्महत्या केली. शेसला मेघा आणि तिचा नवरा शेसला नरेश अशी मृतांची नावं आहेत. अयुंश आणि मिथुन हे दोघंही तेव्हा त्यांच्या मावशीच्या घरी होते. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांना या ठिकाणी दोघांचेही मृतदेह आढळून आले. या दोघांची जी सुसाईड नोट मिळाली त्यात आर्थिक विवंचना, आरोग्याच्या तक्रारी आणि नैराश्य या कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
नरेश इलेक्ट्रिसिटी विभागात लाइनमन म्हणून काम करत होते. तर मेघना या गृहिणी होत्या. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेशला आरोग्याच्या तक्रारी होत्या. तसंच त्याच्या पत्नीलाही आजार होते. हे दोघंही नैराश्यात गेले होते. मेघनाच्या काकांनी ही माहिती दिली. पोलिसांनी असंही सांगितलं की नरेश आणि मेघना यांच्यात काही वाद होते का? किंवा ते इतके नैराश्यात होते याबाबत कुणालाही काहीही माहीत नव्हतं. अचानक असं काही घडेल असंही वाटलं नव्हतं. जी घटना घडली त्यामुळे आम्हालाही धक्का बसला आहे असंही या दोघांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. या घटनेमुळे अयुंश आणि मिथुन ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. या दोघांनीही कुणालाही काहीही कल्पना नसताना हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
