Sathankulam Custodial Death Case : तमिळनाडूमधील साथनकुलम येथील पोलीस कोठडीतील पिता-पुत्राचं मृत्यू प्रकरण २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. पोलीस कोठडीमध्ये पिता-पुत्राचा छळ करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात आता न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे.

तमिळनाडूच्या साथनकुलम शहरातील पोलीस कोठडीतील पिता-पुत्रांच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालावेळी न्यायालयाने महत्वाची टिप्पणी देखील केली. ही घटना अतिशय दुर्मिळ असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

नेमकं घटना काय घडली होती?

तमिळनाडूमधील साथनकुलम शहरातील पोलीस कोठडीत असलेल्या पिता-पुत्रांना गंभीर मारहाणीनंतर पी.जयराज (वय ५८) आणि त्यांचा मुलगा जे.बेनिक्स (वय ३१) यांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये ही घटना घडली होती. आता या प्रकरणात दोषी ठरलेल्या सर्व ९ पोलीस कर्मचाऱ्यांना मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तत्कालीन निरीक्षक एस.श्रीधर, उपनिरीक्षक के. बालकृष्णन, पी.रघु गणेश, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन, ए.समादुराई, कॉन्स्टेबल एम.मुथुराजा, एस. चेल्लादुराई, थॉमस फ्रान्सिस आणि एस.वैलमुथू यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले दहावे आरोपी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पालदुराई यांचा ऑगस्ट २०२० मध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. साथनकुलम कोठडीतील पिता-पुत्रांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने तब्बल सहा वर्षांनंतर २३ मार्च रोजी या सर्व ९ पोलिसांना या दुहेरी हत्याकांडासाठी दोषी ठरवलं होतं.

दरम्यान, या प्रकरणात सीबीआयने २५ सप्टेंबर २०२० रोजी ९ पोलिसांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं आणि १२ ऑगस्ट २०२२ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. व्यापारी जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांना जून २०२० मध्ये कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान दुकान निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ उघडं ठेवलं म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात अमानुष छळ आणि मारहाण झाली आणि यातच या दोघांचा मृत्यू झाला असा आरोप पोलिसांवर होता.