Jawan Court Martial: लष्कराच्या सेवेत असताना जर विनापरवानगी सुट्टीवर गेले तर तर सैनिकावर कारवाई केली जाते. बिहारमधील जवान उपचारासाठी घरी गेल्यानंतर तीन वर्षांहून अधिक काळ गावात राहिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बिहार रेजिमेंट (९ बिहार) च्या ९ व्या बटालियनचे लान्स हवालदार अभय कुमार सिंग यांच्यावर अंबाला येथील जिल्हा कोर्ट मार्शल विभागाने खटला चालवला होता. कोर्ट मार्शलमध्ये कर्नल प्रकाश राज यांच्या अध्यक्षतेखाली हा खटला चालविण्यात आला. ज्याचा निकाल ४ नोव्हेंबर निकाल देण्यात आला.
लष्करी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेले सैनिक अभय कुमार सिंह हे तीन वर्षांहून अधिक काल सेवेत परतलेच नाहीत. त्यानंतर कोर्ट मार्शलची कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये जवानाला नऊ महिन्यांची सक्तमजुरी शिक्षा आणि सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अभय कुमार सिंह यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू असतानाही त्यांनी या वर्षी जानेवारीमध्ये सैन्यातून निवृत्ती घेतली.
जवानावर काय आरोप होते?
जवान अभय कुमार सिंह यांच्यावर तीन आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोन आरोपांमध्ये तो दोषी आढळला होता. पहिला आरोप लष्कर कायद्याच्या कलम ३८ (१) अंतर्गत सेवा सोडण्याशी संबंधित होता. ९ जुलै २०१९ रोजी सिंह लखनौमधील कमांड हॉस्पिटल मधून रजा न घेता निघून गेले. १६ डिसेंबर २०२२ रोजी ते रांचीमधील नामकुम येथील लष्करी रुग्णालयात दाखल झाले, तोपर्यंत त्यांनी रजा घेतलेली नव्हती.
त्यांच्याविरुद्ध दुसरा आरोप होता की, १६ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी नामकुम रुग्णालयात बनावट कागदपत्रे दिली होती. तिसरा आरोप लष्करी कायद्याच्या कलम ६३ (सुव्यवस्था आणि लष्करी शिस्तीला बाधा आणणारे कृत्य) अंतर्गत होता. त्यांची सर्व वैद्यकीय कागदपत्रे अधिकारी मंडळाने काढून घेतली आहेत, असे खोटे कारण त्यांनी वरिष्ठांना सांगितले होते.
खटला चालविण्याचा आदेश
९ इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल भरत मेहतानी यांनी या वर्षी जूनमध्ये सिंग यांच्यावर डीसीएमकडून खटला चालवण्याचे आदेश दिले होते. पहिल्या दोन आरोपांमध्ये जवान दोषी आढळला होता. तर तिसऱ्या आरोपातून तो निर्दोष सुटला.
आरोपी जवानाच्या बटालियनला आणि मेरठमधील युनिटच्या डिव्हिजन मुख्यालयालाही जवानाच्या गावातून तक्रारीची पत्रे पाठविण्यात आली होती. गावात दोन गटात संघर्ष उडाल्यानंतर गावातील काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या. सदर जवान बऱ्याच काळापासून गावातच असून तो अजूनही सेवेत असल्याचा दावा करत आहे, अशी तक्रार करण्यात आली होती.
आरोपी जवानाचा बचाव करताना वकिलांनी युक्तिवाद केला की, अभय सिंह यांनी लष्कराला चांगली सेवा दिली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर ग्रेनेडमुळे दुखापत झाली होती. तसेच त्यांच्याविरुद्ध गावातील शत्रुत्वामुळे खोट्या तक्रारी देण्यात आल्या आहेत.
