तब्बल १०० हून अधिक लोकांची कोट्यवधी रुपयांना आर्थिक फसवणूक करणारा ठग सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगतोय. दरम्यान, न्यायालयाने त्याला छोटासा दिलासा दिला आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव सुकेश चंद्रशेखर याच्यासाठी एअर कूलर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. सुकेशला गेल्या काही दिवसांपासून ताप येतोय. या तापामुळे त्याच्या त्वचेला त्रास होत आहे. त्यामुळे न्यायालयाने सुकेशसाठी एअर कूलरची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.

गेल्या महिन्यात सुकेश चंद्रशेखरने त्याला दुसऱ्या तुरुंगात स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस पाठवली होती. सुकेशने त्याच्या याचिकेत म्हटलं होतं की “मंडोली तुरुंगात त्याच्या जीवाला धोका आहे.” सुकेशच्या या याचिकेवर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी सुकेशच्या वकिलांना विचारलं की “तुमचा आशील आरोपी आहे, त्यामुळे तो त्याला तुरुंगातून स्थलांतरित करण्याची मागणी कशी काय करू शकतो?” याप्रकरणी १९ जुलै रोजी पुढील सुनावणी होईल.

सुकेशने अनेक व्यावसायिक आणि कलाकारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमुळे तो सध्या तुरुंगात कैद आहे. त्याच्यावर वसुली, खंडणीसह फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सुकेश आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालयाच्याही रडारवर आहे. त्याच्या अनेक गुन्ह्यांप्रकरणी आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय तपसा करत आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसशी कनेक्शन

सुकेशचं बॉलिवूड आणि श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसशी नाव जोडलं गेलं होतं. सुकेशच्या आर्थिक अफरातफर प्रकरणांमध्ये जॅकलिनलाही चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. जॅकलिनचा २०० कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरबरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या फोटोवरुन जॅकलिन सुकेशला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर जॅकलिनचे सुकेशबरोबरचे आणखी काही रोमँटिक फोटो समोर आले. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिल्याचे समोर आले. तसेच ९ लाख रुपयांची पर्शियन मांजरही भेट म्हणून दिली होती.

हे ही वाचा >> वैष्णव रेल्वेमंत्री की ‘रीलमंत्री’! अपघातांच्या मालिकेवरून काँग्रेसचा टोला; राजीनाम्याची मागणी

सुकेश चंद्रशेखर बंगळुरुतला एक उद्योगपती आहे. त्याने अनेकांची नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक केली आहे. ७५ लोकांकडून १०० कोटी रुपये घेऊन तो फरार झाला होता. निवडणूक आयोगात ओळख असल्याचे सांगून हवे ते चिन्ह मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला २०१७ मध्ये देखील अटक केली होती. त्यानंतर त्यांचं आणखी एक २०० कोटींचं मनी लाँडरिंग प्रकरण समोर आलं.