मुलींच्या शिक्षण हक्कासाठी लढा देणाऱ्या पाकिस्तानातील युवा नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफझाई हिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या १० दहशतवाद्यांपैकी आठ जणांची ठोस पुरावे नसल्याचे कारण देत गोपनीय पद्धतीने सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे या खटल्याच्या झालेल्या बंदिस्त सुनावणीच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मलालावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाकिस्तान तालिबानच्या १० दहशतवाद्यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने प्रत्येकी २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र त्यापैकी केवळ दोन दहशतवाद्यांनाच आता दोषी ठरविण्यात आले आहे.
आता ठोस पुरावे नसल्याचे कारण देत १० पैकी आठ दहशतवाद्यांना सोडण्यात आल्याने खटल्याच्या बंदिस्त सुनावणीच्या वैधतेबद्दलच संशय व्यक्त केला जात आहे. दोन्ही बाजूंचे वकील, अन्य संबंधित अशा मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत ही बंदिस्त सुनावणी घेण्यात आली होती.
लंडनमधील पाकिस्तानच्या दूतावासाचे प्रवक्ते मुनीर अहमद यांनी आठ दहशतवाद्यांना सोडण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. स्वातमधील जिल्हा पोलीस प्रमुख सलीम मारवत यांनीही स्वतंत्रपणे या वृत्ताला दुजोरा दिला.