नवी दिल्ली :  ‘भारत बायोटेक’च्या कोव्हॅक्सिन लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली असली तरीही या लसीच्या दोन मात्रा करोनाशी लढण्यात केवळ ५० टक्केच परिणामकारक ठरत असल्याचे पहिल्या प्रत्यक्ष पाहणीतून समोर आले. ‘द लॅन्सेट इन्फेक्शस डिसीज जर्नल’मध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीत भारतामध्ये जानेवारी महिन्यात कोव्हॅक्सिन लशीला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर लाखो नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाणारी लस ही आणीबाणीच्या परिस्थितीत कशी मंजूर होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर लॅन्सेटनेच केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये कोव्हॅक्सिन ही करोनाविरोधात ७७.८ टक्के परिणामकारक असल्याचे म्हटले होते. मात्र ताज्या पाहणीनुसार कोव्हॅक्सिन ही लस केवळ निम्म्या क्षमतेने करोनाविरोधात उपकारक ठरत असल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षण काळात भारतात दुसरी लाट कार्यरत होती आणि चाचणीसाठी जे नमुने घेण्यात आले, त्यापैकी ८० टक्के रुग्णांमध्ये ‘डेल्टा’ विषाणू आढळला होता.

झाले काय?   

दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील २,७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांना १५ एप्रिल ते १५ मे या दरम्यान करोनाची बाधा झाली. या कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. या कर्मचाऱ्यांचा अभ्यास  केल्यानंतर ‘द लॅन्सेट’ला लशीची परिणामकारकता ठरवण्यात मदत झाली. प्रयोगशाळेतील चाचणीव्यतिरिक्त या लशीची ही पहिली प्रत्यक्ष पाहणी होती.

थोडी माहिती..

भारत बायोटेकने ही लस बनवताना भारताच्या राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने अलग केलेल्या करोना विषाणूचा नमुना वापरला होता.  ही लस दिल्यानंतर शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती करोना विषाणूची रचना ओळखू शकते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला करोनाशी लढणे सोपे होते. या लशीचे दोन डोस चार आठवडय़ांच्या अंतराने घ्यावे लागतात.

कमी, तरी..

करोना विषाणू आणि ‘डेल्टा’ विरोधात या लशीच्या परिणामकारकतेविषयी अधिक संशोधन व्हायला हवे, असे तज्ज्ञांचे मत आहे.  कोव्हॅक्सिन ५० टक्केच परिणामकारक असली तरी तिच्या सुरक्षेबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे ‘द लॅन्सेट’ने म्हटले आहे.

‘डेल्टा’ उत्प्रेरक कार्यरत असताना कोव्हॅक्सिन किती क्षमतेने कार्यरत राहू शकते, याचे स्पष्ट चित्र नव्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे करोनाशी लढण्यासाठी लसीकरण कार्यक्रमाला गती देण्याबरोबरच मुखपट्टी वापर आणि इतर सुरक्षेच्या उपायांचाही वापर व्हायला हवा.

मनीष सोनेजा, अभ्यासगटातील प्राध्यापक.