कोविड-१९ च्या सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आपली कोव्हॅक्सिन लस ७८ टक्के परिणामकारक असल्याचे या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील अंतरिम विश्लेषणाच्या निष्कर्षांमध्ये आढळले आहे, असे या लशीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकने बुधवारी सांगितले.

कोव्हॅक्सिन ही लस घेतल्यानंतर, करोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता १०० टक्क्यांनी कमी होत असल्याचे तिसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या अंतरिम आकडेवारीतही दिसून आले होते, असे या कंपनीने नमूद केले.

सध्या करोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे, कुठलीही लक्षणे नसलेल्या १२७ प्रकरणांची नोंद करण्यात आली आणि करोनाच्या सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये ही लस ७८ टक्के परिणामकारक ठरत असल्याचा अंदाज त्यातून हाती आला, असे भारत बायोटेकने एका निवेदनात सांगितले.

‘सार्स सीओव्ही-२ विरुद्धची लशीची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. मानवी नैदानिक चाचण्या आणि आणीबाणीच्या परिस्थितीतील वापर यात कोव्हॅक्सिनने सुरक्षेबात उत्कृष्ट निकाल दिले आहेत. भारतात संशोधन आणि विकास यातून तयार झालेली कोव्हॅक्सिन ही आता जागतिक नावीन्यपूर्ण लस ठरली आहे’, असे भारत बायोटकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी सांगितले. कोव्हॅक्सिनमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा आणि रोगाच्या संक्रमणाचा धोका कमी होत असल्याने, तीव्र स्वरूपाच्या कोविड-१९ आणि लक्षणहीन संसर्गाबाबतची परिणामकारकतेची आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे, असेही एल्ला म्हणाले.