करोना विषाणू आताप्रमाणेच पुढे पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनने रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देणारी कार्यपद्धती विकसित केल्यास देशात तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा भीती दिल्लीतील 'एम्स'चे (All India Institute of Medical Sciences-AIIMS) संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन उपयोगी नसून, विषाणूची साखळी तोडायची असेल, तर कडकडीत लॉकडाउन लाग करण्याची आवश्यकता आहे, असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं. 'एम्स'चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणं, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन आणि कडक लॉकडाउन लागू करण्याबाबत भूमिका मांडली. डॉ. गुलेरिया म्हणाले,"आता तीन गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. पहिली म्हणजे रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं. दुसरी, आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन. आपल्याला विषाणू संसर्गाची साखळी तोडावी लागणार आहे. जर आपण माणसामाणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे," असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. "माणसांचा संपर्क टाळायचा म्हणजे आपण त्याला लॉकडाउन म्हणू शकतो. युकेप्रमाणेच लॉकडाउन लागू करावा लागेल. मग तो राज्यांच्या पातळीवर असो वा राष्ट्रीय पातळीवर. हे सगळं धोरणकर्त्यांना (सरकार) ठरवावं लागणार आहे. कारण माणसाचं जीवन आणि त्याचा उदरनिर्वाह याची नीटपणे हाताळणी करण्यासंदर्भातील हा मुद्दा आहे आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचाही. त्याचप्रमाणे दररोज मजूरी करून पोट भरणाऱ्याचाही मुद्दा आहे. पण, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत लॉकडाउन आवश्यक आहे," असंही गुलेरिया यांनी स्पष्ट केलं. “सरकारकडे रणनीती नसल्याने लॉकडाउन हा एकमेव पर्याय”- राहुल गांधी < येथे वाचा सविस्तर वृत्त #CoronaVirus #CoronavirusinIndia #Lockdown #RahulGandhi #CentralGovt @RahulGandhi pic.twitter.com/eFgpnvrECL — LoksattaLive (@LoksattaLive) May 4, 2021 "फक्त रुग्णालयातील पायाभूत सुविधांवर भर देऊन चालणार नाही, तर रुग्णसंख्या कमी करण्यावरही लक्ष द्यावं लागेल. वीकेंड लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यू लागू करणं निरर्थक आहे. जर आपण लॉकडाउन लागू करण्याबद्दल म्हणाल, तर तो पुरेशा कालावधीसाठी असला पाहिजे. कमीत कमी दोन आठवड्यांसाठी तरी. हा लॉकडाउन कडकडीत असायला हवा. जर रुग्णसंख्या लवकर घटली, तर आपण तो लवकरही उठवू शकतो," असंही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.