करोनाचे नवीन स्ट्रेन निर्माण झाले असून, दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. माहितीच्या या गर्दीत अफवांचाही पूर येत असून, त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीने घर केलं आहे. कोणत्याही माहितीची खातरजमा न करता नागरिक अफवांवरही विश्वास ठेवत असल्याचं दिसत आहे. राजस्थानमधील एका गावात अशीच एक घटना घडली आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून करोनाचा संसर्ग आजूबाजूच्या परिसरात पोहचू शकतो, या भीतीपोटी नागरिकांनी अंत्यसंस्कारच रोखले.

राजस्थानातील नयापुरा गावात ही घटना घडली आहे. तिलोकचंद सोनी यांचा करोनाचा संसर्ग झाला होता. जोधपूरमधील एमडीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. कोविडमुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रोटोकॉल ठरवण्यात आलेला आहे. त्याचं पालन करत सोनी यांचं पार्थिव कुटुंबियांनी लालसागर येथे अंत्यसंस्कारासाठी आणलं.

मृतदेह घेऊन शववाहिका स्मशानभूमीत दाखल झाली. कुटुंबीयांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. त्याचवेळी काही लोक तिथे जमा झाले. मृतदेहावर दुसरीकडे अंत्यसंस्कार करावे, असं ते सोनी यांच्या कुटुंबीयांना सांगू लागले. मयत व्यक्ती करोना बाधित होती आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर निघाणाऱ्या धुरामुळे करोनाचा विषाणू आजूबाजूच्या गावात पसरू शकतो. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांना त्याचा संसर्ग होईल, असं गावकरी म्हणाले.

गावकऱ्यांच्या मागणीनंतरही सोनी यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, गावकऱ्यांचा विरोध कायम होता. तिलोकचंद सोनी यांचे बंधू मूलचंद यांनी सांगितलं की, ‘आम्ही गावकऱ्यांना समजावून सांगण्याचा, त्यांची मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचा विरोध कायम होता. त्यामुळे आम्ही पार्थिव घेऊन दुसऱ्या स्मशानभूमीत गेलो.’ सोनी कुटुंबीयांनी त्यानंतर १० किमी अंतरावर असलेल्या नागौरी गेट येथील स्मशानभूमीत जाऊन तिलोकचंद सोनी यांच्यावर अंत्यसंस्कार केले.