scorecardresearch

करोनाचा नवीन विषाणू ‘निओकोव्ह’ माणसांसाठी किती धोकादायक?; WHO ने दिले उत्तर

करोना विषाणूचा आणखी एक प्रकार निओकोव्हने शास्त्रज्ञांमध्ये चिंता वाढवली आहे.

Covid 19 new variant neocav risk for humans WHO answer
(प्रातिनिधीक छायाचित्र)

जग सध्या करोना व्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकाराशी लढत करत आहे. दरम्यान, या धोकादायक विषाणूचा आणखी एक प्रकार निओकोव्हने शास्त्रज्ञांमध्ये चिंता वाढवली आहे. पण हा नवीन प्रकार मानवांसाठी घातक आहे का? जागतिक आरोग्य संघटनेने आता याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. वटवाघळांमध्ये आढळून येणाऱ्या करोना विषाणूचा आणखी एक प्रकार मानवी शरीरात दाखल होऊ शकतो, अशी भीती चीनमधील काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

अहवालानुसार हा प्रकार दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळून आला आहे. पण हा प्रकार मानवासाठी घातक आहे का, याचा अजून अभ्यास व्हायला हवा, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. रशियातील वृत्तसंस्था ‘तास’ नुसार, डब्ल्यूएचओने, आम्हाला वुहानच्या शास्त्रज्ञांच्या नवीन शोधाची माहिती आहे. हा प्रकार मानवांवर परिणाम करेल की नाही? त्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे, असे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की मानवांमध्ये संसर्ग होण्याचे ७५ टक्के स्त्रोत प्राणी आणि विशेषतः वन्य प्राणी आहेत. प्राण्यांमध्येही करोना विषाणू आढळून आला आहे. यामध्ये वटवाघळांचाही समावेश आहे, ज्यांना विविध प्रकारच्या विषाणूंचे नैसर्गिक वाहक म्हणून ओळखले जाते. चिनी संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधात या नवीन प्रकाराचा उल्लेख केला आहे. त्यांचा दावा आहे की हा विषाणू जास्त जोखमीचा आहे आणि त्याचा प्रसाराचा वेगही खूप जास्त आहे. वुहानमधील शास्त्रज्ञांच्या शोधनिबंधानुसार, हा नवा प्रकार निओकोव्ह (MERS-CoV) हा कोविड-१९(SARS-CoV-2) सारखाच आहे. श्वसनाच्या  आजाराशी संबंधित हा प्रकार असल्याचं BioXriv या जर्नलमध्ये सांगण्यात आलं आहे आणि अद्याप त्याचे पुनरावलोकन केले गेले नाही.

संशोधनाच्या आधारावर, असे सांगण्यात आले आहे की निओकोव्ह विषाणू नवीन नाही. हा MERS-CoV विषाणू MERS-CoV विषाणूशी संबंधित आहे. २०१२ मध्ये हा विषाणू मध्य पूर्वेकडील देशांमध्ये सापडला आहे. हा SARS Cove 2 सारखाच आहे, ज्यामुळे करोना विषाणू मानवांमध्ये पसरला होता. हा विषाणू वटवाघुळांमधल्या ACE 2 नावाच्या रिसेप्टर प्रोटीनद्वारे पसरतो. याचे म्युटेशन झाले तर विषाणू मानसांमध्ये पसरू शकतो. यामध्ये मृत्युदर आणि संक्रमण दर दोन्ही उच्च आहेत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही याबाबत माहिती दिली आहे.”हा निओकोव्ह जुन्या MERS Covशी संबंधित आहे. हा विषाणू DPP4 रिसेप्टर्सचा वापर करूनच पेशींमध्ये प्रवेश करू शकतो. हा विषाणू वटवाघळांमधले Ace2 रिसेप्टर्स वापरूनच संसर्ग पसरवू शकतो, पण म्युटेशन झाल्याशिवाय तो मानवामधले Ace 2 रिसप्टर वापरू शकत नाही,” अशी माहिती डॉ. शशांक जोशी यांनी ट्विट करुन दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या वटवाघळांमध्ये सापडला विषाणू

दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये निओकोव्ह विषाणू आढळून आला आहे. तो सध्या फक्त याच पक्ष्यांमध्ये पसरतो, परंतु ‘BioRxiv’ वेबसाइटवर प्रीप्रिंट म्हणून प्रसिद्ध झालेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की तो माणसांना देखील संक्रमित करू शकतो. वुहान युनिव्हर्सिटी आणि चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेस, इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्सचे शास्त्रज्ञ म्हणतात की निओकोव्ह च्या फक्त एका उत्परिवर्तनाने, ते मानवी पेशींमध्ये पसरण्यास सुरवात करेल. चिनी संशोधकांच्या मते, निओकोव्ह मध्ये उच्च संसर्ग दर गाठण्याची क्षमता आहे आणि प्रत्येक तीन संक्रमितांपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid 19 new variant neocav risk for humans who answer abn

ताज्या बातम्या