scorecardresearch

सावध…ऐका पुढल्या हाका! ब्रिटनमध्ये Omicron चा पहिला बळी; पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची माहिती

ओमायक्रॉन व्हेरिएंट हा वेगाने पसरत आहे आणि साधारण दोन ते तीन दिवसांनी याचा संसर्ग दुपटीने वाढत आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला एक रुग्ण दगावल्याची माहिती पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दिली आहे. त्यांनी लंडनमधल्या पॅडिंग्टन भागातल्या एका लसीकरण केंद्राला भेट दिली, त्यावेळी त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान जॉन्सन म्हणाले, दुःखाची गोष्ट अशी की ओमायक्रॉनच्या रुग्णांना आता रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडू लागली आहे. आत्तापर्यंत किमान एका रुग्णाचा ओमायक्रॉनची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्याचा हा विषाणू सौम्य मानावा लागेल. त्यामुळे याच्या पुढच्या प्रादुर्भावाचा विचार करुन आपल्याला सावध राहायला हवं. जास्तीत जास्त लोकसंख्येच्या लसीकरणाच्या गतीवर अधिक लक्ष केंद्रीत करायला हवं. बूस्टर डोस देणं हे आत्ता आपल्या परीने सर्वोत्तम काम आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे संकट वाढणार? देशातील निम्मी प्रकरणे राज्यात; आणखी दोघांना लागण

रविवारी रात्री जनतेशी तात्काळ साधलेल्या संवादात बोरीस जॉन्सन म्हणाले की, या वेगाने पसरणाऱ्या विषाणूची मोठी लाट येण्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत. त्याचबरोबर त्यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांवरील सर्वांना करोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस देण्याची घोषणा केली आहे. जॉन्सन म्हणाले, मला भीती वाटत आहे की आपल्याला या नव्या व्हेरिएंटशी लढण्यात आता आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करावा लागेल.

त्यामुळे आपण आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी लसीकृत व्हायला हवं.
ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी सोमवारी सांगितलं की, ओमायक्रॉन व्हेरिएंट हा वेगाने पसरत आहे आणि साधारण दोन ते तीन दिवसांनी याचा संसर्ग दुपटीने वाढत आहे. इंग्लंडमध्ये या व्हेरिएंटची लागण झालेल्या १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid 19 omicron variant uk prime minister boris johnson vsk