नवी दिल्ली : लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसमात्रांची संख्या १२७.६१ कोटींहून अधिक झाली असल्याने, भारताच्या पात्र प्रौढ लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक जणांचे करोना प्रतिबंधक लसीकरण झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी सांगितले.

भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी ८४.८ टक्क्यांहून अधिक लोकांना करोना प्रतिबंधक लशींची पहिली मात्रा देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘भारताचे अभिनंदन. पात्र लोकसंख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोकांचे संपूर्ण लसीकरण होणे हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपण सारे मिळून करोनाविरुद्धची लढाई जिंकू’, असे ट्वीट मांडविया यांनी केले. २४ तासांच्या कालवधीत १,०४,१८,७०७ लसमात्रा देण्यात आल्यामुळे, देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या १२७.६१ कोटींहून अधिक झाली असून; १,३२,४४,५१४ सत्रांद्वारे हे साध्य झाले असल्याचे सकाळी ७ वाजेपर्यंतच्या हंगामी अहवालात म्हटले आहे.