देशात करोनाचा वेग मंदावला आहे. दैनंदिन रुग्ण संख्या कमी होत आहेत. मात्र, शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत करोनाचे १०,४८८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 313 लोकांचा मृत्यू झाला. तर १२,३२९ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आता एकूण १,२२,७१४ सक्रिय रुग्ण शिल्लक आहेत. शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १०,३०२ रुग्णांचीन नोंद करण्यात आली होती तर २६४ जणांना आपला जीव गमवावा लागला. देशातील करोनामधून बरे होण्याचा दर ९८.२९ टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण ३,३९,२२,०३७ लोक करोनातून बरे झाले आहेत. त्याच वेळी, ४,६५,६६२ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय देशात आतापर्यंत एकूण ३,४५,१०,४१३ करोना रुग्ण आढळले आहेत.

लोकांना करोनापासून वाचवण्यासाठी भारत सरकार सातत्याने करोना लसीकरण मोहीम राबवत असून, त्याअंतर्गत आतापर्यंत १,१६, ५०, ५५, २१० लसी देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. शनिवारी ६७ लाख २५ हजार ९७० डोस देण्यात आले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने माहिती दिली आहे की २० नोव्हेंबरपर्यंत देशभरात करोनाच्या ६३ कोटी १६ लाख ४९ हजार ३७८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी शनिवारी १० लाख ७४ हजार ९९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली होती.