करोनाच्या नवीन बाधितांमध्ये होत असलेली घट ही देशासाठी दिलासादायक असली तर अचानक वाढणाऱ्या प्रकरणांमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३१,३८२ नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत ही आकडेवारी १.७ टक्क्यांनी कमी आहे. तर ३१८ करोना बाधितांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर, २४ तासांमध्ये ३२,५४२ लोकांनी करोनावर मात केली आहे.

करोना महामारीच्या सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी ३५ लाख ९४ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ४६ हजार ३६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी २८ लाख ४८ हजार लोक बरे झाले आहेत. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे तीन लाख आहे. एकूण ३ लाख १६२ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ५ राज्यांतून ८६.६ टक्के नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये एकट्या केरळमध्ये ६२.७२ टक्के प्रकरणे आढळली. त्यापैकी केरळमध्ये गेल्या एका दिवसात सर्वाधिक १९,६८२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यासह, महाराष्ट्रात ३,३२०, तामिळनाडूमध्ये १,७४५, मिझोराममध्ये १,२५७ आणि आंध्र प्रदेशात १,१७१ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.