भारतात करोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी करोना रुग्णांच्या संख्येमध्ये थोड्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या २४ तासांत भारतात १४,३१३ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत, तर मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ५४९ करोनाबाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशात १४,३१३ नव्या करोनाबाधिताची नोंद झाली आहे. तर ५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १३,५४३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे देशात सध्या एक लाख,६१ हजार,५५५ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

त्यानंतर देशात आतापर्यंत करोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या ३,३६,४१,१७५ झाली आहे. भारतातील कोविड-१९ लसीकरणाची संख्या आता १०५.४३ कोटींहून अधिक झाली आहे. गेल्या २४ तासांत ५६.९१ लाखाहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात बरे होण्याचे प्रमाण सध्या ९८.१९ टक्के आहे. देशातील सक्रिय प्रकरणे एकूण प्रकरणांपैकी एक टक्के (०.४७%) पेक्षा कमी आहेत. सध्या, भारतातील पॉझिटिव्ही रेट १.१८ टक्के आहे, जो गेल्या सलग ३६ दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.