करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे आजपासून पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियामधून वितरण सुरू झाले आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आले. पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये पाठविण्यात आल्या. अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद,  गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये या लसी पाठवण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मात्र भारतात होणाऱ्या या लसीकरणामध्ये कंडोम बनवणारी एक सरकारी कंपनी महत्वाची भूमिका बजावणार आहे.

लसींच्या वितरणाला सुरुवात

भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सरकारने अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला लस खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लसीची निर्मिती पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट करत आहे. सोमवारी दुपारी आम्हाला भारत सरकारकडून लस खरेदीची ऑर्डर मिळाली. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २१० रुपये असेल असे सीरमच्या अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे. ही ऑर्डर मिळाल्यानंतर मंगळावारी सकाळपासूनच लसीच्या वितरणास सुरुवात झालीय.

कोणाला आधी मिळणार लस

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस खरेदीसाठी सुद्धा आरोग्य मंत्रालय लवकरच खरेदी करार करणार आहे. ही स्वदेशी लस आहे. औषध नियंत्रकांनी सीरम आणि भारत बायोटेकच्या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी (अनेक शारीरिक व्याधी) असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील.

मोदी म्हणाले जगातील सर्वात मोठी मोहीम

तीन कोटी करोना योद्धय़ांच्या लसीकरणाचा पहिल्या टप्प्यातील खर्च केंद्र सरकारतर्फे उचलण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली आहे. पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींचा समावेश नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतातील लसीकरण कार्यक्रम ही जगातील सर्वात मोठी मोहीम असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. ‘‘येत्या काही महिन्यांत भारतातील ३० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, या तुलनेत जगातील ५० देशांमध्ये केवळ अडीच कोटीच नागरिकांना लस देण्यात येईल’’, असे मोदी म्हणाले.

लसींच्या किंमती वेगवेगळ्या

सीरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेककडे सरकारने काही मोफत लसींची मागणी केली आहे. भारत बायोटेकने मोफत लसी देण्यासाठी संमती दर्शवली आहे. तर दुसरीकडे सीरम इन्स्टिटयूटसोबत काही लसी मोफत देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. कोव्हिशिल्डच्या प्रत्येक लसीची किंमत २१० रुपयांच्या आसपास असणार आहे. तर कोव्हॅक्सिनची किंमत ही ३१० रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोव्हॅक्सिनची एकच लस देण्यात येणार असल्याचे तिची किंमत अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

कंडोम बनवणाऱ्या कंपनीवर जबाबदारी

कंडोम बनवणारी हिंदुस्तान लैटेक्स लिमिटेड (एचआयएल) या सरकारी कंपनीकडे सीरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेककडून करोनाच्या लसी विकत घेण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे वृत्त न्यूज १८ ने सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. १९५० च्या दशकामध्ये एचआयएलने सरकारच्या कुटुंब नियोजन योजनेमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली होती. नैसर्गिक रबरापासून लैटेक्स कंडोम बनवण्यापासून या कंपनीने आरोग्य सेवांच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. अनेक वर्ष या कंपनीने निरोध नावाने सरकारी कुटुंब नियोजन योजनेचा भाग म्हणून कंडोम निर्मिती केली होती.