scorecardresearch

Premium

करोना लस मोफत नाही, ‘त्या’ घोषणेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं घुमजाव

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन. (संग्रहित छायाचित्र)
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन. (संग्रहित छायाचित्र)

देशभरात लसीकरणाची तयारी सुरू असून, शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनचा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी फक्त दिल्लीतच नाही, तर देशभरात करोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत सुखद धक्का दिला. केंद्राकडून झालेल्या घोषणंच स्वागत होत असतानाच केंद्रीय मंत्र्यांनी पुढच्याच क्षणी घुमजाव केलं. पहिल्या टप्प्यातच करोना लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल खुलासा केला.

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. मात्र, काही वेळातच त्यांनी सगळ्यांना मोफत लस दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले,”फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे,” अशी माहिती दिली.

देशभरात लस मोफत लस दिली जाणार असल्याचं वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर आरोग्य मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत सारवासारव केली. “लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस मोफत दिली जाणार आहे. देशभरात लस पुरवली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी व २ कोटी कोविड काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. प्राधान्यक्रमातील २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल, याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी मोफत लसीच्या घोषणेवर सारवासारव केली.

देशवासियांना केलं आवाहन

“देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid 19 vaccine will be provided free of cost across the country bmh

First published on: 02-01-2021 at 12:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×