देशात पुढील महिन्यापासून करोना लसीकरणाची शक्यता -अदर पूनावाला

२० टक्के लोकांना  लस मिळाली, की सर्वाचा आत्मविश्वास परत येत असल्याचे  दिसेल

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड विद्यापीठ- अ‍ॅस्ट्राझेनेका यांची लस विकसित करत असलेल्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे कोविड-१९ लसीकरणाची मोहीम भारतात जानेवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. या लसीच्या आणीबाणीकालीन वापरासाठी चालू महिना अखेपर्यंत आपल्याला परवानगी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ऑक्टोबर २०२१ पर्यंत भारतातील प्रत्येकाचे लसीकरण होईल आणि त्यानंतर सामान्य जीवन पुन्हा सुरळीत होईल अशी आपल्याला अपेक्षा असल्याचे पूनावाला यांनी एका परिषदेत बोलताना सांगितले.

या महिनाअखेर आम्हाला करोना लशीच्या आणीबाणीच्या वापरासाठी परवाना मिळू शकेल, मात्र मोठय़ा प्रमाणावर वापरासाठीचा प्रत्यक्ष परवाना नंतर मिळेल. तथापि, औषध नियंत्रकांनी परवानगी दिल्यास भारतातील लसीकरणाची मोहीम जानेवारी २०२१ पर्यंत सुरू होऊ शकेल, असेही पूनावाला म्हणाले.

कोविड-१९ च्या भारतातील लशींच्या वापरासाठी ३ केलेल्या अर्जाची विषय तज्ज्ञ समिती (सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी- एसईसी पडताळणी करत आहे. सध्या सुरू असलेल्या नैदानिक चाचण्यांमधील सुरक्षा व परिणामकारकता याबाबत उशिराच्या टप्प्यातील अतिरिक्त माहिती द्यावी, असे त्यांनी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया व भारत बायोटेक यांना सांगितले होते.

२० टक्के लोकांना  लस मिळाली, की सर्वाचा आत्मविश्वास परत येत असल्याचे  दिसेल, असा आशावाद पूनावाला यांनी व्यक्त केली.

चाचण्यांत तडजोड नाही : कांग

नवी दिल्ली : कोविड-१९ प्रतिबंधक लशीच्या सुरक्षा व परिणामकारक तेच्या चाचण्या करताना कुठलीही तडजोड करण्यात आलेली नाही, असा निर्वाळा ज्येष्ठ वैज्ञानिक गगनदीप कांग यांनी दिला आहे.

लशीच्या चाचण्या करताना कुठल्याही निकषांना फाटा दिलेला नाही, असे सांगून साथरोग सज्जता आघाडीच्या सदस्या असलेल्या कांग यांनी म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील संस्थांचा चमू करोना लशीवरील चाचण्यात सहभागी असून जगात व देशात कोविड-१९ प्रतिबंधक लस सर्वाना समान पातळीवर उपलब्ध करण्यात यावी. कोविड-१९ लशी कमी काळात तयार केलेल्या असल्या, तरी त्यातील चाचणीच्या टप्प्यांवर तडजोड केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. चाचण्यातील कुठलेही टप्पे वगळले नसून केवळ दृष्टिकोनात्मक बदल केले आहेत. उलट आताच्या परिस्थितीत नियामक संस्था जास्त काळजीपूर्वक काम करीत आहेत. लस चाचण्यात कुठलीही घाई करण्यात आलेली नाही. वेगाने निष्कर्ष हाती येण्यासाठी मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्या शहरात शीतगृहे आहेत तेथील लोकांना लस लवकर व आधी मिळणार बाकीच्यांना नंतर असे काहीही होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बहारिनमध्ये चीनच्या कोविड लशीला मान्यता

दुबई : चीनच्या कोविड -१९ प्रतिबंधक लशीला बहारिनने मान्यता दिली आहे. याआधी फायझर व बायोएनटेक यांच्या एमआरएनए लशीलाही या देशाने मान्यता दिली होती. बहारिनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या सिनोफार्म कंपनीच्या लशीस मान्यता देण्यात आली असून या लशीला कुठल्या अभ्यासाच्या किंवा पुराव्याच्या आधारे परवानगी दिली याचे स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.

अमेरिकेत ट्रक सज्ज

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने कोविड -१९ प्रतिबंधक फायझर लशीला मान्यता दिल्यानंतर आता या लशीच्या वाहतुकीसाठी ट्रक सज्ज झाले आहेत. लवकरच अमेरिकेत लसीकरण सुरू केले जाणार असून सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे,पण लस घेण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. लशींच्या कुप्या घेऊन ट्रक विविध राज्यांत रवाना होणार आहेत. सुरुवातीला ३० लाख डोस पाठवण्यात येणार असून आरोग्य कर्मचारी व नर्सिंग होममध्ये असलेल्यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. संघराज्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फायझर लस सोमवारपासून वितरण केंद्रात पोहोचण्यास सुरुवात होईल. मंगळवारी आणखी ४२५ ठिकाणी लस पोहोचेल व बुधवारी उर्वरित ६६ केंद्रांवर लस पोहोचवली जाईल. ही लस फायझर व बायोएनटेक यांनी तयार केली असून प्रत्येक राज्यातील प्रौढांच्या संख्येनुसार तिचे वितरण केले जाणार आहे. पेनसिल्वेनिया आरोग्य केंद्राने ज्यांना लस द्यायची अशा आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. फायझरची लस विविध केंद्रात आल्यानंतर ती उणे ९४ अंश सेल्सियस तापमानाला साठवावी लागणार आहे. फायझरने ही लस पाठवण्यासाठी कोरडा बर्फ असलेली खोकी वापरली असून जीपीएस आधारित संवेदक प्रत्येक ट्रकवर लावण्यात आले आहेत. अंटाक्र्टिकातील तापमानापेक्षा कमी तापमानाला ही लस साठवून पुरवली जात आहे. स्थानिक औषध दुकाने, लसीकरण केंद्रे येथे तीन आठवडय़ात लस पोहोचवण्याचे काम पूर्ण होणार आहे. आगामी काही दिवसात लुईझियाना व मिसीसीपी येथे ९ हजार कुप्या पोहोचवल्या जातील, असे ओशनर हेल्थ सिस्टीम या रुग्णालयाच्या आरोग्य संचालक सँड्रा केमर्ली यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Covid vaccination in the country from next month says adar poonawala zws