नवी दिल्ली : झायडस कॅडिलाची झायकोव्ह डी ही कोविड प्रतिबंधक लस मुलांसाठी ऑगस्टमध्ये उपलब्ध होईल व बहुधा त्या महिन्यात लसीकरणही सुरू होईल, असे मत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी व्यक्त केले आहे.

१२ ते १८ वयाच्या मुलांवर लशीच्या चाचण्या जुलैच्या अखेरीस पूर्ण होणार आहेत. त्यानंतर लगेचच या लशीला आपत्कालीन वापराचा परवाना मिळू शकतो. मुलांना लस दिल्यास शाळा सुरू होण्याचा मार्ग खुला होण्यास मदत होईल असे मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी काल व्यक्त केला होता.  झायकोव्ह डी ही लस ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता असून त्या महिन्यापासूनच मुलांचे लसीकरण सुरू करता येईल असे सांगून अरोरा यांनी म्हटले आहे की, सरकारने येत्या काही महिन्यांत दिवसाला १ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सहा ते आठ महिन्यात हे काम करण्यात येईल. लोकांनी लस घेण्यासाठी स्वत:हून पुढे यावे. लशीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. भारतात तयार करण्यात आलेल्या लशी  ९५-९६ टक्के सुरक्षित असून सरकार लशीचे जर काही वाईट परिणाम होत असतील तर त्यावर लक्ष ठेवून आहे. ९५ ते ९६ टक्के लोकांमध्ये सौम्य ताप व वेदना अशी लक्षणे दिसतात. पाच टक्के लोकांना वावडे म्हणजे अ‍ॅलर्जीमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागते व ते बरेही होतात. लशी सुरक्षित आहेत यावर दुमत असण्याचे कारण नाही. झायडस कॅडिलाची लस ही डीएनए प्रकारातील असून त्याचा आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे. यापूर्वी डीएनए लशीवर भारतात संशोधन झाले नव्हते पण आता ती तयार करण्यात यश मिळवले आहे. अजून चाचण्यांची माहिती घेणे चालू आहे. ती महा औषध नियंत्रकांना मंजुरीसाठी पाठवली जाईल. त्यानंतर या लशीला आपत्कालीन वापरासाठी  मंजुरी मिळेल यात शंका नाही.

राज्यांकडे १.१५ कोटींहून अधिक लसमात्रा

देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे वापरण्यात न आलेल्या लशीच्या १.१५ कोटींहून अधिक मात्रा अद्याप उपलब्ध असल्याचे सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ३१.६९ कोटींहून अधिक लसमात्रा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी वाया गेलेल्या लशींसह आतापर्यंत ३० कोटी ५४ लाख १७ हजार ६१७ मात्रा वापरण्यात आल्या आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.