उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका व्यक्तीची बऱ्याच काळापासून करोनाशी सुरु असलेली झुंज यशस्वी ठरली आहे. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तब्बल १३० दिवसांनी विश्वास सैनी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. २८ एप्रिल रोजी सैनी यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर, सुरुवातीचे काही दिवस त्यांनी घरीच उपचार घेतले. परंतु, पुढे तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैनी हे जवळपास महिनाभर व्हेंटिलेटरवर देखील होते. होता. त्यानंतर, त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवून पुढील उपचार करण्यात आले. आता अखेर तब्बल १३० दिवसांनंतर ते रुग्णालयातून पुन्हा आपल्या घरी आले आहेत. असं असलं तरी काही काळ त्यांना ऑक्सिजन सपोर्टची गरज असणार आहे.

विश्वास सैनी यांच्यावर उपचार करणारे डॉ. एम. सी. सैनी म्हणतात की, “जेव्हा विश्वास सैनी यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं तेव्हा त्यांची प्रकृती इतकी वाईट होती की, आम्ही कोणत्याही सकारात्मक परिणामांची अपेक्षाच ठेवली नव्हती. पण सैनी यांच्या जगण्याच्या आणि उपचार घेण्याच्या इच्छाशक्तीमुळे हे सर्व शक्य झालं आहे. सैनी यांना जवळपास एक महिना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर ऑक्सिजन सपोर्टवर ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्याचसोबत, आताही त्यांना घरी काही काळ ऑक्सिजनची गरज असणार आहे.”

सैनी म्हणाले, एक वेळ अशी होती…!

करोनातून बरं होऊन तब्बल १३० दिवसांनंतर घरी पोहचलेल्या विश्वास सैनी यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विश्वास सैनी म्हणाले की, ही एक खूप दिलासादायक बाब आहे. मी १३० दिवसांनंतर पुन्हा एकदा माझ्या कुटुंबासह माझ्या घरी आहे. एक वेळ अशी होती की, जेव्हा मला भीती वाटत होती. मी करोनामुळे लोकांचा मृत्यू होताना पाहत होतो. पण माझ्या डॉक्टरांनी माझं मनोबल वाढवलं. मला बरं होण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. डॉक्टरांच्या उपचारांमुळे आणि कुटुंबाच्या आशीर्वादामुळे मी आज पुन्हा एकदा माझ्या प्रियजनांसोबत आहे.”