ओमायक्रॉनवर कोविशिल्ड लस प्रभावी की बूस्टर डोस घ्यावा लागणार?; अदर पूनावालांनी दिली महत्त्वाची माहिती

दरम्यान, भविष्यात बूस्टर डोस लागू करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने सध्यातरी स्पष्ट केले आहे.

Covishield omicron variant booster dose adar poonawalla

जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतात कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गरज भासल्यास नवीन करोना प्रकारासाठी वेगळी कोविशील्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. कोविशील्ड लस नवीन प्रकाराविरूद्ध किती प्रभावी आहे हे येत्या २-३ आठवड्यांत कळेल. अशा परिस्थितीत, आवश्यक असल्यास, ओमायक्रॉनचे संकट लक्षात ठेवून बूस्टर डोस देखील शक्य आहे, असे मत अदर पूनावाला यांनी मांडले आहे.

एनडीटीव्ही सोबत बोलताना अदर पूनावाला यांनी या नव्या प्रकाराबाबत भाष्य केले आहे. ‘ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील संशोधन करत आहेत, त्यांच्या संशोधनाच्या आधारे आम्ही एक नवीन लस बनवण्याचा विचार करू शकतो, जी बूस्टर डोस म्हणून काम करेल. संशोधनाच्या आधारे, आम्ही लसीचा तिसरा आणि चौथा डोस देण्याबाबत निर्णय घेण्यास सक्षम होऊ, असे पूनावाला यांनी म्हटले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ओमायक्रॉन प्रकाराशी लढण्यासाठी विशिष्ट लस आवश्यक आहे, असे नाही. तसेच पूनावाला म्हणाले की बूस्टर डोसची आवश्यकता असल्यास, कंपनीकडे आधीच पुरेसे डोस आहेत, जे त्याच किंमतीत दिले जातील.

“द लॅन्सेट इन्फेक्शस डिसीज जर्नलमध्ये कोविशिल्ड लसीची परिणामकारकता खूप जास्त आहे आणि लक्षणीयरीत्या रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आणि मृत्यूची शक्यता कमी करते असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. कोविशिल्ड ची परिणामकारकता कालांतराने कमी होईल असे आवश्यक नाही,” असे पूनावाला म्हणाले.

“आमच्याकडे लाखो डोस स्टॉकमध्ये आहेत. आम्ही भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २० कोटी डोस आरक्षित केले आहेत. जर सरकारने बूस्टर डोस जाहीर केला, तर आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसी आहेत. सध्या प्राधान्याने करोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे, असे अदर पूनावाला म्हणाले.

दरम्यान, भविष्यात बूस्टर डोस लागू करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने सध्यातरी स्पष्ट केले आहे. केंद्राच्या करोना समितीचे प्रमुख एनके अरोरा म्हणाले होते की, भारत आणि युरोप-उत्तर अमेरिकन देशांमध्ये परिस्थिती सारखी नाही. आपल्या लोकसंख्येच्या मोठ्या संख्येने करोना संसर्ग झाला आहे आणि लस अतिरिक्त संरक्षण प्रदान करत आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की अस्तित्वात असलेल्या लसी ओमायक्रॉन विरूद्ध काही संरक्षण प्रदान करणार नाहीत असा कोणताही पुरावा नाही. गेल्या वर्षभरात नवीन प्रकार दिसू लागले असूनही लसींनी गंभीर आजारांपासून संरक्षण दिले आहे, असे विद्यापीठाने मंगळवारी सांगितले. ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, ओमायक्रॉनने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कारण त्यात उत्परिवर्तनांची संख्या जास्त आहे, जी डेल्टा प्रकारापेक्षा खूप जास्त आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covishield omicron variant booster dose adar poonawalla abn

ताज्या बातम्या