युरोपीय वैद्यक संस्थेकडून कोविशिल्ड या लशीला महिनाभरात मान्यता मिळेल, असा विश्वास सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.

पूनावाला यांनी सांगितले की, लस पासपोर्टचे प्रश्न हे दोन देशातील निर्णयांच्या आदानप्रदानाशी संबंधित असतात. युरोपीय वैद्यक संस्थेने अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या मार्फत आम्हाला मान्यतेसाठी अर्ज करायला सांगितला होता ते योग्यच होते. महिनाभरापूर्वी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पण त्याच्या निर्णयास काही कालावधी लागतो. ब्रिटनच्या ‘एमएचआरए’ या संस्थेने व जागतिक आरोग्य संघटनेने लशीबाबत निर्णय घेताना ठरावीक कालावधी घेतला होता. आम्ही युरोपीय वैद्यक संस्थेकडे अर्ज केला असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असा विश्वास पूनावाला यांनी व्यक्त केला.

लस पारपत्राच्या विषयावर विचारले असता त्यांनी सांगितले की, तो थोडासा वेगळा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आमच्या लशीला मान्यता दिली आहे. विविध देशांना आदानप्रदानाअंतर्गत या लशींना मंजुरी देणे गरजेचे आहे. भारतानेही युरोपीय समुदायास कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशींचा हरित पारपत्रयोजनेत समावेश करून त्यांना मंजुरी देण्याची अधिकृत विनंती केली आहे.