गोहत्या आणि गोमांस विषयावरून देशात सुरू असलेल्या वादविवादामध्ये आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनीही उडी घेतली आहे. गोहत्या करणाऱ्यांना देशात राहण्याचा हक्कच नाही, असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. हरिद्वारमध्ये गोपाष्टमीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.
ते म्हणाले, गोहत्या करणारी व्यक्ती कोणत्याही समुदायाची असो, ती देशाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. अशा व्यक्तीला देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. उत्तराखंडमध्ये जो कोणी गोहत्या करेल. त्याच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर राज्यात गायींचे रक्षण करण्यासाठी आम्ही उपाययोजना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
गायींना चारा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर केवळ उत्तराखंडमध्ये गायींच्या संगोपनासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.