गुजरातमधील गोहत्या प्रकरणात गांधीनगर जिल्ह्यातील न्यायालयाने अहमदाबादमधील तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालात न्यायालयाने मनुस्मृतीसह वेद आणि हिंदू धर्मग्रंथांमधील उल्लेखांचा संदर्भ देत गायीला ‘जगाची माता’ असं संबोधलं आहे. २६ऑक्टोबर रोजी कलोल न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ब्रिजेशकुमारी रामेश्वर सिंह राजपूत यांनी हा निकाल दिला. तिघांना जन्मठेपेसह प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

वसीम कुरेशी (३४), मोहम्मद रफीक कुरेशी (२४) आणि अशफाक बेहलिम (१९) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. २२ ऑगस्ट २०२४ रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून २७७ किलो मांस जप्त करण्यात आलं होतं. तपासणीनंतर हे मांस गोमांस असल्याचं निष्पन्न झालं होतं.

न्यायालयाच्या आदेशात मनुस्मृती आणि वेदांचा उल्लेख

न्यायालयाने आपल्या आदेशाची सुरुवात एका संस्कृत श्लोकाने केली. गोरक्षण हे धर्म आणि करुणा यांच्याशी निगडित असून, गोहत्या झाल्यास कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असा या श्लोकाचा आशय आहे. पुराव्यांच्या आधारे आरोपींचा गुन्हा सिद्ध झाल्यास कायद्यानुसार शिक्षा दिली पाहिजे, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

“गाय ही जगाची माता मानली जाते. तिच्या शरीरात ३३ कोटी देवतांचे वास्तव्य असल्याची श्रद्धा आहे. तिचे चार पाय चार वेदांचं प्रतीक आहेत,” असं निरीक्षण न्यायालयाच्या आदेशात नोंदवण्यात आलं आहे.

कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त

अभियोजन पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी कलोल तालुक्यातील जमला गावातील धनकणी वास परिसरातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून कथित गोमांस, जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि मांस वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारं वाहन जप्त करण्यात आलं होतं.

या प्रकरणी कलोल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ललबाई मणिलाल सेनमा (५५), वसीम कुरेशी, मोहम्मद रफीक कुरेशी, अशफाक बेहलिम, गुलाम मोईन मुश्ताक अहमद इस्माईल कुरेशी (२४) आणि विठ्ठल उर्फ भूपत (३७) अशी सहा आरोपींची नावं होती. ललबाई सेनमा यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.

जनावरांची कत्तल करून आर्थिक फायदा मिळवण्याचा आरोप

अभियोजन पक्षाच्या आरोपानुसार, ललबाई सेनमा आणि त्यांचा मुलगा विठ्ठल हे अशक्त किंवा दूध न देणाऱ्या गायी आणि म्हशी खरेदी करत होते. त्यानंतर अहमदाबादमधून वसीम, रफीक आणि अशफाक यांना बोलावून जनावरांची कत्तल केली जात होती. यातून आर्थिक फायदा मिळवण्याचा त्यांचा उद्देश असल्याचा आरोप करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी गोमांस विक्रीसाठी गुलाम मोईन यांच्याकडे पाठवण्याच्या तयारीत असल्याचं अभियोजन पक्षाने न्यायालयात सांगितलं. खटल्यादरम्यान अभियोजन पक्षाने ५४ साक्षीदारांची साक्ष आणि १८ कागदोपत्री पुरावे सादर केले. त्यानंतर न्यायालयाने सहापैकी तीन आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

२०१७ मध्ये कायद्यात सुधारणा; गोहत्येसाठी जन्मठेप

आरोपींना गुजरात पशुसंवर्धन कायदा, १९५४ अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या कायद्यात २०१७ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. गायी आणि तिच्या वंशातील जनावरांची कत्तल करण्यास बंदी घालणाऱ्या या कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन केल्यास जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. “गुजरातमध्ये गोहत्या करणाऱ्यांना कायदा कधीही सोडणार नाही, असा स्पष्ट संदेश या निकालातून मिळाला आहे. गोमातेचं संरक्षण हा गुजरातचा ठाम संकल्प आहे,” असं त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयात पुरावे सादर केल्याबद्दल त्यांनी गांधीनगर पोलिसांचं आणि सरकारी पक्षाचं अभिनंदन केलं आहे.