गोमूत्र म्हणजे दुर्धर रोगांवरील रामबाण औषध- मीनाक्षी लेखी

गोमूत्राचे सेवन करायला लागल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली

गोमाता हा समस्त भाजपवासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याचा प्रत्यय मंगळवारी लोकसभेत आला. यापूर्वीही भाजपच्या अनेक नेत्यांकडून जाहीर व्यासपीठांवर गाय आणि गोमूत्र याविषयीची जाहीर व्याख्याने देण्यात आली आहेत. मात्र, काल भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी थेट लोकसभेत गोमूत्राची महती सांगितली. लोकसभेत काल प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा प्रकार घडला. सरकारने गोवंशाशी संबंधित प्राचीन भारतीय विज्ञानाच्या प्रसारासाठी कोणते उपक्रम हाती घेतले आहेत, असा प्रश्न मीनाक्षी लेखी यांनी विचारला. यासाठी त्यांनी माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांच्या आजारपणाचा दाखला दिला. काही दिवसांपूर्वी एक माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल खूप आजारी होते. मात्र, गोमूत्राचे सेवन करायला लागल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली, असे लेखी यांनी सांगितले. यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही ‘औषध ते औषधच’ अशी टिप्पणी केली. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी लेखी यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. यासंदर्भातील संशोधनासाठी कर्नाल येथे लवकरच राष्ट्रीय गोमंग उत्पादकता केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येणार असल्याची माहिती राधामोहन सिंह यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या एका चुकीवरून मीनाक्षी लेखी चर्चेत आल्या होत्या. ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’ असे बोर्डवर लिहून दाखवण्याची विनंती त्यांना एका कार्यक्रमात करण्यात आली. मात्र त्यानंतर मीनाक्षी लेखी यांनी जे काही लिहीले ते पाहून उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. इतकेच नाही तर त्यांना शेवटपर्यंत ‘स्वच्छ’ हा शब्द लिहिताच आला नाही. त्यामुळे ट्विटरवर #MeenakshiLekhi या हॅशटॅगने त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cow urine helped govt official recover from serious illness meenakshi lekhi