Sitaram Yechuri Admitted in AIIMS: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आयसीयू अर्थात अतीदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू असल्याचं पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
सीताराम येचुरी यांना सोमवारी ताप, अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांना रुगणालयात दाखल करण्यात आलं. सोमवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात हलवल्याचं वृत्त पीटीआयनं पक्षाच्या निवेदनाच्या हवाल्याने दिलं आहे. त्यांची प्रकृती सध्या नेमकी कशी आहे, याबाबत रुग्णालयाकडून अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, हिंदुस्तान टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सीताराम येचुरी यांना न्यूमोनियाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतीच त्यांच्यावर मोदीबिंदूची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.
सीताराम येचुरी यांची राजकीय कारकिर्द
सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील एक महत्त्वाचं नाव मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठीची अनेक आंदोलनं झाली. माकपचे नेते व खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला परखड शब्दांत जाब विचारला आहे.
सीताराम येचुरी यांनी १९७४ साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये प्रवेश केला. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यदेखील झाले. १९७५ साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक झाली. १९७७-७८मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. प्रकाश करात यांच्यासह सीताराम येचुरी यांनी त्या काळात जेएनयूमधील डाव्या विचारप्रवाहाचं नेतृत्व केल्याचं मानलं जातं.
‘राजा-प्रजा’ प्रथेकडे आपला उलटा प्रवास – सीताराम येचुरी
१९८४ साली सीताराम येचुरी माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले. पॉलिट ब्युरोमध्ये त्यांचा प्रवेश झाला. २०१५ साली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्त झाले. यादरम्यान त्यांनी तब्बल १२ वर्षं राज्यसभेत खासदार म्हणून काम केलं. या काळात त्यांनी कामगार, मागासवर्ग, मध्यमवर्ग यांचे अधिकार यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडल्या.