भाजप प्रणीत एनडीए सरकारच्या काळात जनविरोधी धोरणे राबवली जात असून या राजकीय परिस्थितीत धर्मनिरपेक्ष लोकशाही आघाडी स्थापन करणे ही काळाची गरज आहे, असे मत माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले.

पक्षाच्या आंध्र प्रदेश शाखेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात ते उपस्थित होते. माकप अशी पर्यायी धर्मनिरपेक्ष व लोकशाही आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेईल.
एनडीए सरकार जनविरोधी धोरणे राबवित आहे. त्यामुळे खासगीकरणाला उत्तेजन मिळत असून थेट परकीय गुंतवणुकीला अडथळा राहिलेला नाही. सार्वजनिक क्षेत्रात निर्गुतवणूक केल्याने देशात आर्थिक व राजकीय पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. भाजप व त्याचा वैचारिक मार्गदर्शक असेलला रा.स्व.संघ हे लोकांचे खऱ्या प्रश्नांवरून लक्ष उडवण्यासाठी जातीय दंगली घडवित आहेत.
दिल्लीतील कल पाहता लोकांच्या भावना सरकारविरोधी असल्याचे स्पष्ट होते. केवळ नऊ महिन्यात एनडीए राजवटीत लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले असा आरोप केला.