दोडा/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात घरांना तडे गेल्याने १९ कुटुंबांना तातडीने तात्पुरत्या आश्रय छावण्यांत हलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
दोडापासून ३५ किलोमीटरवर थाथरी येथील किश्तवार-बटोटे राष्ट्रीय महामार्गालगतच्या नई बस्ती गावातील एक मशीद आणि मुलींची शाळाही प्रशासनाने असुरक्षित म्हणून जाहीर केली आहे.
उपविभागीय दंडाधिकारी (थाथरी) अथर अमीन झरगर यांनी सांगितले, की या गावातील काही इमारतींना काही दिवसांपूर्वीच तडे जाऊ लागले होते. परंतु गुरुवारी झालेल्या भूस्खलनामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. बऱ्याच इमारतींचे नुकसान झाले असून, त्यांची संख्या २१ वर पोहोचली आहे. आमचे येथे सातत्याने लक्ष आहे. येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यकतेनुसार पावले उचलत आहोत. मात्र, येथील स्थितीची तुलना उत्तराखंडमधील जोशीमठशी करू नये, असे झरगर यांनी स्पष्ट केले.
झरगर यांनी सांगितले, की जोशीमठ येथील स्थिती मोठय़ा प्रमाणावर जमीन खचल्याने झाली आहे. त्याच्याशी दोडा येथील स्थितीची तुलना करणे योग्य ठरणार नाही. येथे भूस्खलनाची समस्या भेडसावत आहे. चिनाब खोरे ऊर्जा प्रकल्प व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी या भागाची पाहणी केली आहे. काही कुटुंबे जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यात स्थलांतरित झाली आहेत, तर अनेक जण त्यांच्या वडिलोपार्जित घरी परतले. आम्ही या छावण्यांत अन्न आणि वीजपुरवठय़ासह सर्व आवश्यक सोयी पुरवत आहोत.
येथे कुटुंबासह स्थलांतर केलेल्या झाहिदा बेगम यांनी सांगितले, की ते १५ वर्षांपासून या गावात राहतात आणि त्यांना आपल्या काँक्रीटच्या घरांना तडे गेल्याने आश्चर्य वाटले. गावातील ५० पेक्षा जास्त कुटुंबांत भीतीचे वातावरण आहे. गुरुवारच्या भूस्खलनानंतर बहुतांश इमारतींना तडे गेले आहेत.
आणखी एक स्थानिक रहिवासी फारुख अहमद यांनी सांगितले, की पोलीस, माजी सैनिक, संरक्षण दल कर्मचारी आणि मजुरांच्या १९ कुटुंबांतील ११७ सदस्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. नई बस्ती वीस वर्षांपूर्वी विकसित करण्यात आली होती. आतापर्यंत इथे अशी कोणतीही समस्या नव्हती. आम्ही संस्था व इच्छुकांना आवाहन करतो की त्यांनी बाधितांना मदत करावी. योग्य पुनर्वसनाची मागणी हे स्थलांतरित करत आहेत.