Boy trades gold for momos In UP: उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. मोमोजच्या व्यसनापायी १४ वर्षीय मुलाने घरातच हात साफ करत, लाखो रुपयांचे दागिने चोरी केले आहेत. हा मुलगा रस्त्यावरील या मोमोजच्या इतका आहारी गेला होता की तो घरातून दागिन्यांची चोरी करु लागला होता, असे चौकशीतून समोर आले आहे.

मोमोजच्या बदल्यात दागिने

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगा मोमोज या फास्टफूडच्या आहारी गेला होता. मोमोज खाण्यासाठी घरातच चोरी करु लागला होता. मुलगा घरातून गुपचूप सोन्याचे दागिने घेऊन जाऊ लागला. धक्कादायक बाब म्हणजे मोमोजच्या बदल्यात तो विक्रेत्याला दागिने देऊ लागला होता. कुटुंबीयांना मात्र या प्रकाराबाबत कुठलीच कल्पना नव्हती. घरातून दागिने गायब झाल्याचे उघड झाल्यानंतर कुटुंबीयांना पोलिसांत धाव घेतली.

मावशीमुळे उघडकीस आली चोरी

मुलाची मावशी दागिने घेण्यासाठी घरी आली त्यावेळी दागिने चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. दागिने ठेवलेली तिजोरी उघडण्यात आली त्यावेळी तिथं दागिने नसल्याचे दिसून आले. यानंतर कुटुंबीयांनी घरातच चौकशी करण्यास सुरुवात केली त्यावेळी १४ वर्षीय मुलानेच दागिने चोरी केल्याचे उघड झाले. मोमोजसाठी मुलगा विक्रेत्याला दागिने देत होता, असे मुलांनी कुटुंबीयांना सांगितले. रामपूर येथे हा मोमोज विक्रेता असल्याचे समोर आले आहे.

पोलिस तक्रार दाखल

या घटनेमुळे धक्का बसलेल्या पोलिसांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी मुलांच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी मोमोज विक्रेत्याचा शोध घेतला जात आहे. यासाठी मुलाचीही चौकशी केली जात आहे. एकूण किती रुपयांचे दागिने देण्यात आले याबाबतही माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.