सध्या जगभरात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे करोनाची तिसरी लाट येणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ओमायक्रॉनचा हा संसर्ग अगदी भारतात आणि महाराष्ट्रातही येऊन पोहचला आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड-एस्ट्रोजेनेका करोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ डेम सारा गिल्बर्ट यांनी आगामी काळात जीवघेणी साथ येणार असल्याचा गंभीर इशारा दिलाय. त्या ४४ व्या डिम्बलबी व्याख्यानात बोलत होत्या. यावेळी त्यांनी अशा साथीरोगांच्या तयारीसाठी निधीची गरज असल्याचं सांगत निधी उपलब्ध झाला तरच हा प्रकोप थांबवता येईल असंही नमूद केलं.

डेम सारा गिल्बर्ट यांनी नव्या करोना विषाणूमुळे करोना विरोधी लसीची परिणामकारकता कमी होऊ शकते, असंही सांगितलं. गिल्बर्ट म्हणाल्या, “जोपर्यंत करोनाच्या नव्या विषाणूबाबत अधिक माहिती समोर येत नाही तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरीने वागलं पाहिजे. एखाद्या विषाणूमुळे आपल्या उपजीविकेला आणि जीवालाच धोका निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. खरंतर हे आहे की आगामी काळात येणारा साथीरोग यापेक्षाही वाईट असेल. हा आजार अधिक संसर्गजन्य आणि घातक असेल.”

“पुन्हा साथीरोगामुळे तयार झालेल्या परिस्थितीत जाऊ शकत नाही”

“या साथीरोगाच्या वेळी आपण जे पाहिलंय ते आगामी काळात पुन्हा पाहायला लागण्याच्या स्थितीत आपण जाऊ शकत नाही. करोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे आपल्याकडे साथीरोगांचा सामना करण्यासाठी पैसे नाहीत. आपण करोनातून जे शिकलो आहे त्यातून आपण खूप काही शिकलं पाहिजे,” असं गिल्बर्ट यांनी सांगितलं.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानं निर्बंध लादणार का? आयुक्त राजेश पाटील म्हणाले…

ओमायक्रॉन विषाणूवर अँटिबॉडीचा परिणाम होईल का?

ओमायक्रॉन विषाणूवर अँटिबॉडीचा परिणाम होईल का यावर बोलताना डेम सारा गिल्बर्ट म्हणाल्या, “या विषाणूच्या स्पाईक प्रोटिनमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे या विषाणूची संसर्ग क्षमता वाढली आहे. या विषाणूची रचना वेगळी असल्यानं करोना विरोधी लसीमुळे शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूंचा संसर्ग रोखू शकणार नाही, असंही होऊ शकतं.”