Car Dashcam Unfolds Murder Mystery After Engineer Kills Friend In Bengaluru: सुरुवातीला अपघात वाटणारी घटना खून प्रकरण असल्याचा प्रकार बंगळुरुच्या इलेक्ट्रॉनिक सिटीतून समोर आला आहे. कारच्या डॅशकॅममुळे ही घटना अपघात नसून खून असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यादिशेने तपास सुरु करण्यात आला. दारुच्या नशेत सॉफ्टेवेअर अभियंत्याने मित्राचा खून केल्याचे डॅशकॅमच्या व्हिडिओतून समोर आले आहे. रविवारी (२५ जानेवारी) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

डॅशकॅममुळे उघडकीस आला प्रकार

प्रशांत एम (वय ३३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कारच्या मदतीने संरक्षण भिंत आणि झाडासोबत चिरडून प्रशांतचा खून केल्याचे फुटेजमधून समोर आले आहे. रोशन हेगडे (३६) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस उपायुक्त एम. नारायण यांनी घटनेचा तपास करत असताना डॅशकॅम पडताळून पाहण्याचे आदेश दिले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

रोशन हेगडे याने कार संरक्षक भिंत आणि झाडाला घासली. यामध्ये चिरडल्याने प्रशांतचा मृत्यू झाला. कारच्या समोरील उजव्या बाजूस प्रशांत लटकला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त नारायण यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. याप्रकरणी प्रशांतची आई अनु यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

भासली अपघाताची घटना, निघाले खून प्रकरण

सुरुवातीला अनेकांना हा अपघात असल्याचे भासले. पोलिसांनी देखील अपघात समजून घटनेचा तपास सुरु केला. दरम्यान, पोलिस उपायुक्त एम. नारायण यांनी डॅशकॅम तपासल्यानंतर घटनेचे सत्य समोर आले. हेगडेने कारचा वेग वाढवला आणि संरक्षक भिंत आणि झाडाला जोरदार धडक दिली. समोरच्या भागावर लटकलेल्या प्रशांतला यामुळे गंभीर जखम झाली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला, असे या फुटेजमधून समोर आले आहे.

हेगडेने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातून त्याला अटक केली. किरकोळ जखम झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याला चौकशीसाठी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, प्रशांत, रोशन त्यांच्या इतर मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेटनंतर त्यांनी दारु प्यायली. दारुच्या नशेत प्रशांतने रोहनकडे लायटर मागितले आणि शिवीगाळ केली. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोघांनी एकमेकांवर बियरच्या बाटलीने हल्ला केला.

रोशन कारमध्ये बसून जात होता. गाडी सुरु करुन जात असताच प्रशांतने गाडीवर उडी घेतली. प्रशांत कारच्या समोरच्या भागावर दारानजीक लटकला. रोशनने वेग वाढवून कारला संरक्षक भिंत आणि झाडाला घासली, यामध्ये चिरडून प्रशांत गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. प्रशांतचा मृत्यू होण्यापूर्वी दोघेही एकमेकांना शिवीगाळ देऊन धमकावत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.