भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भेट घेतल्यापासून कपिल देव हे राज्यसभेत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शुक्रवारी अमित शाह यांनी कपिल देव यांच्या घरी जाऊन भेट घेतली. शाह यांनी देव यांची भेट का घेतली ? हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण भाजपाचे चाणक्य असलेले अमित शाह आता कोणती नवीन रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१४ मध्ये भाजपा आणि शिरोमणी अकाली दलाकडून कपिल देव यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संपर्क करण्यात आला होता. पण त्यावेळी राजकारणापासून दूर राहण्याला त्यांनी प्राधान्य दिलं होतं. मात्र, आता राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठीचं गैरराजनितीक नामांकन आल्यास कपिल देव ते नाकारणार नाहीत, असा अंदाज भाजपाच्या नेत्यांकडून वर्तवला जात आहे. आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामांकन दिलं जातं. या कोट्यातून १२ जागा असतात, त्यापैकी आता ७ जागा खाली आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ताकद वाढवण्यासाठी भाजपाने गांगुलीला पक्षामध्ये घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचं सांगितलं जात आहे. ‘पश्चिम बंगे बीजेपी चाइ’ म्हणजे ‘बंगालमध्ये आम्हाला भाजपा हवीये’ या नावाच्या एका फेसबुक पेजवर गांगुली भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला होता, तेव्हापासून गांगुली भाजपात जाणार असल्याची चर्चा येथे रंगली आहे. पण, भाजपाच्या कोणत्याही नेत्याने किंवा गांगुलीने स्वतःही याबाबतच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही किंवा नाकारलंही नाहीये.

२०१४ मध्ये भाजपाने गांगुलीला लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, पण गांगुलीने त्यावेळी नकार दिला होता. भाजपाने ऑफर दिली होती पण माझी जागा क्रिकेटच्या मैदानात आहे, राजकारणाच्या नाही असं म्हणत गांगुलीने त्यावेळी ती ऑफर नाकारली होती.