क्रिकेटकडून राजकारणाच्या पीचकडे वळलेले भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. सोमवारी रात्री भाजपाने दिल्लीतील दोन उमेदवारी यादी प्रसिद्ध केली. गौतम गंभीर यांना पूर्व दिल्लीतून तिकीट देण्यात आले आहे तर मीनाक्षी लेखी नवी दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.

गौतम गंभीर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. तेव्हापासूनच ते लोकसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झाले. काश्मीर तसेच अन्य सामाजिक प्रश्नांवर गौतम गंभीर यांनी नेहमीच आपली ठोस भूमिका मांडली आहे. भारताचा हा डावखुरा फलंदाज आता राजकारणाच्या पीचवर नवीन इनिंग सुरु करणार आहे.

भारताचा हा डावखुरा फलंदाज आता राजकारणाच्या पीचवर नवीन इनिंग सुरु करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या गौतम गंभीर यांनी मागच्या महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला. पंतप्रधानांचे या देशाबद्दलचे जे व्हिजन आहे. त्याने मी प्रभावित झालो आहे. देशासाठी काहीतरी करण्यासाठी माझ्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे असे भाजपामध्ये प्रवेश करताना गौतम गंभीर म्हणाले होते.

भाजपाने सोमवारी दिल्लीतून पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यातील चार जणांना पक्षाने पुन्हा तिकिट दिले आहे. दिल्लीत लोकसभेच्या एकूण सात जागा आहेत. केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांना चांदनी चौक तर मनोज तिवारी उत्तर पूर्व दिल्लीतून लढणार आहेत.