|| महेश सरलष्कर

काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाने प्रभावित असलेल्या शोपियाँ, अनंतनाग या जिल्ह्य़ांमध्ये शुक्रवारी अत्यंत तणावपूर्ण स्थिती होती. जम्मू-काश्मीर राज्यासाठीच्या, वादग्रस्त ठरलेल्या कलम ३५ (अ) समर्थनार्थ सलग तिसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला. त्यातच, दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कुटुंबीयांचे अपहरण केल्यामुळे या दोन्ही जिल्ह्य़ांतील गावांमध्ये परिस्थिती आणखी चिघळली होती.

सर्वोच्च न्यायालयात कलम ३५ (अ) संदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. आता ही सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या बाहेरील व्यक्तींना या राज्यात जमीन खरेदी करता येत नाही. या तरतुदीला घटनेच्या ३५ (अ) कलमानुसार संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे हे कलम काढून टाकण्यास काश्मीर मुस्लिमांकडून कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे गुरुवारपासूनच काश्मीर खोरे तसेच, राजौरी आणि पुंछ या जम्मू प्रदेशातील जिल्ह्य़ांमध्ये बंद पाळला गेला. त्यामुळे राजौरापासून अनंतनागपर्यंतच्या संपूर्ण पट्टय़ातील गावांमधील सर्व व्यवहार ठप्प झालेले होते.

मध्यम आकाराच्या शोपियाँ शहरामध्ये भयाण शांतता होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास देखील रस्त्यावर कोणीही नव्हते. क्वचितच एखाद-दुसरी व्यक्ती जाताना दिसत होती. दुकाने बंद असल्याने शहराला ‘ओसाड’ रूप आलेले होते. शोपियाँचे पोलीस प्रमुख संदीप चौधरी यांनी निवासस्थानी भेट दिली. ३५ (अ)मुळे पुकारलेल्या बंदच्या स्थितीचा चौधरी सातत्याने फोनवरून आढावा घेत होते.

या शिवाय, पोलिसांच्या कुटुंबीयांच्या अपहरणामुळे शोपियाँ, पुलवामा, अनंतनागमधील परिस्थिती संवेदनशील बनली होती. अपहरणासंदर्भात काहीही बोलण्यास चौधरी यांनी नकार दिला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ११ कुटुंबीयांचे शुक्रवारी अपहरण केले. त्यानंतर पोलिसांनीही दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांना अटक केली होती. ‘हिजबुल’च्या एका कमांडरच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांनी सुटका केल्यामुळेच दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कुटुंबांच्या सर्व सदस्यांना शुक्रवारी संध्याकाळी सोडून दिले.

शोपियाँपासून अध्र्या किमी अंतरावर लष्करी तळ असून मधोमध असलेल्या रस्त्यातून लोकांना जावे लागते. परिसरातील गंभीर परिस्थितीमुळे तैनात जवान अधिकच दक्षता घेत होते. त्यापुढे अनंतनागपर्यंतच्या पट्टय़ातील सर्व गावांमध्येही स्थिती वेगळी नव्हती. अनंतनाग शहरातही कडेकोट बंद होता. रस्ते पूर्ण मोकळे होते, कोणत्याही स्वरूपाची सुरक्षा यंत्रणा दिसत नव्हती. शहराच्या मुख्य चौकात तरुण गटागटाने हातात लाकडे घेऊन उभे होती. मात्र, अनंतनागमध्ये शुक्रवारी कोणतीही िहसाचाराची घटना घडली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

जम्मू विभागातील राजौरी, पुंछ, मंडी, सुरणकोट या मुघल रोडवरील गावांमध्येही बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी टायर जाळून लोक केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त करीत होते. निषेधानंतर पाणी टाकून आग विझवलीही जात होती.