तालिबानी कमांडरच्या तीन भावांना अटक

पाकिस्तानातील किशोरवयीन मानवी हक्क कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पाकिस्तानी सुरक्षा संस्थांनी स्वात खोऱ्यातील तालिबानी कमांडरच्या तीन भावांना अटक केली आहे. मलाला सध्या व्हेन्टिलेटरवर असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

मलाला युसूफझाई हल्ला प्रकरण
पाकिस्तानातील किशोरवयीन मानवी हक्क कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पाकिस्तानी सुरक्षा संस्थांनी स्वात खोऱ्यातील तालिबानी कमांडरच्या तीन भावांना अटक केली आहे. मलाला सध्या व्हेन्टिलेटरवर असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. खैबर-पख्तुनवा प्रांतातील नौशेरा येथे काल या तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना जाबजबाबासाठी अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या तिघांचा भाऊ तालिबानचा वरिष्ठ कमांडर असून तो स्वात खोऱ्यात लष्कराचे वर्चस्व निर्माण होण्यापूर्वी मौलाना फझलुल्ला गटाचे नेतृत्व करीत होता. स्वात जिल्हा पोलिस प्रमुख गुल अफजल खान आफ्रिदी यांनी असे सांगितले होते,  की मलाला हिच्यावरील हल्ल्याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. त्यानंतर आता या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर मलाला हिच्यावर हल्ल्यात सामील असल्याचा आरोप आहे.
आफ्रिदी यांनी सांगितले, की मलाला हिच्यावर मंगळवारी झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हा अताउल्ला असून त्याला पकडणे बाकी आहे. मलाला हिच्या स्कूलबसच्या चालकाचे जाबजबाब घेण्यात आले तसेच अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. जाबजबाबानंतर त्यांना सोडण्यात आले. तालिबान्यांच्या हल्ल्यात तिच्या डोक्याला व मानेला गोळी लागली होती.
संयुक्त अरब अमिरातीचा पुढाकार
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीच्या राजकुटुंबीयांनी पाकिस्तानात तालिबानी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मलाला युसूफझाई या किशोरवयीन मुलीला उपचारासाठी इतरत्र हलवणे सोयीचे व्हावे यासाठी हवाई रुग्णवाहिका पाठवण्याचे ठरवले आहे. जर तिला अधिक उपचारांसाठी परदेशात हलवावे लागले तर ते सोपे जावे यासाठी अमिरातीने ही योजना आखली आहे. संयुक्त अरब अमिरातीचे जे विमान मलाला हिच्या मदतीकरिता पाठवले जाणार आहे त्यातील कर्मचारी व सहा डॉक्टर यांना व्हिसा मंजूर करण्यात आला आहे, असे पाकिस्तानचे अबुधाबीतील राजदूत जमिल अहमद खान यांनी जिओ न्यूज चॅनेलला सांगितले.
हवाई रुग्णवाहिका ही तिला हलवण्याचा निर्णय होईपर्यंत इस्लामाबाद येथे राहणार आहे. दुबई व अबुधाबी येथील तीन रुग्णालयांत मलाला हिच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. चौदा वर्षांची मलाला हिच्यावर ती दोन मैत्रिणींसह शाळेत जात असताना गेल्या मंगळवारी तालिबान्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात तिच्या डोक्याला गोळी लागली आहे.
मलाला हिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. तिच्यावर सध्या रावळपिंडी येथे उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीतील सुधारणेचा आढावा घेतला असून, तिच्यात अपेक्षेप्रमाणे सुधारणा दिसत असल्याचे लष्कराचे मुख्य प्रवक्ते मेजर जनरल असीम सलीम बजवा यांनी सांगितले.
मलाला हिला व्हेन्टिलेटरवर ठेवले असून तिला पेशावरहून रावळपिंडीत हलवण्यात आले होते. बजवा यांनी सांगितले, की अशा प्रकारच्या जखमांमध्ये प्रकृतीत सुधारणा होण्यास वेळ लागतो. तिला परदेशात हलवण्याचा निर्णय झालेला नसला तरी तिला तातडीने हलवण्याची व्यवस्था मात्र तयार ठेवण्यात आली आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crime international taliban malala yousufzai pakistan islamabad

ताज्या बातम्या