Crime News : Havmor या प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँडचं पार्लर सील करण्यात आलं आहे. कारण एका महिलेने या आईस्क्रीमच्या कोनमध्ये पालीचं शेपूट आढळल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही घटना घडली आहे. अहमदाबाद महापालिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे. अहमदाबादच्या नरोदा भागात हॅवमोर आईस्क्रीमच्या फॅक्टरीचा एक विभाग आहे. या विभागाकडून संपूर्ण बॅच मागे घेण्यात आली आहे. तसंच या विभागावर ५० हजारांचा दंडही लावण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली?
अहमदाबाद येथील मणिनगर भागात हॅवमोरचं एक पार्लर आहे. त्या ठिकाणी एका महिलेने हॅपी कोन विकत घेतला. जो ८० मिलिग्रॅमचा होता. कोन खात असताना त्यामध्ये पालीच्या शेपटीचा भाग असल्याचं महिलेला लक्षात आलं. हे पार्लर महालक्ष्मी कॉर्नर या ठिकाणी आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर हे दुकान तातडीने बंद करण्यात आलं. अशी माहिती अतिरिक्त आरोग्य आयुक्त डॉ. भाविन जोशी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
घडल्या प्रकाराबाबत महिलेची पोस्ट
हॅवमोर आईस्क्रीमच्या कोनमध्ये पालीचं शेपूट आढळल्यानंतर महिलेने एक पोस्ट लिहिली. यात ती महिला म्हणते, हॅवमोअर हा प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रांड आहे म्हणून मी त्या कंपनीचा कोन विकत घेतला. तो मी खाऊ लागले तेव्हा मला काहीतरी विचित्र लागलं. मग लक्षात आलं की ती पालीची शेपूट आहे. यानंतर मला अस्वस्थ होऊ लागलं आणि रुग्णालयात दाखल करावं लागलं. यानंतर ही सगळी घटना समोर आली.
हॅवमोअरच्या प्रवक्त्यांचं म्हणणं काय?
हॅवमोअरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणात आम्ही ग्राहकाला जो अनुभव आला त्यासाठी दिलगीर आहोत. तसंच त्यांच्याशी संपर्क साधत आहोत. या घटनेची चौकशी केली जाईल. हॅवमोअरची उत्पादनं तयार करताना आम्ही सुरक्षेचे सगळे निकष पाळतो. तसंच यापुढेही ते सगळे निकष आम्ही पाळू असंही कंपनीने सांगितलं. घडल्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.