Crime News in West Bengaluru :पश्चिम बंगळुरूतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निद्रावस्थेत असलेल्या पत्नीची तिच्या पतीने गळा चिरून हत्या केली. एवढंच नव्हे तर पत्नीच्या शेजारी तिची मैत्रीण झोपली होती, तरीही तिला याचा सुगावा लागला नाही. तिला सकाळी जाग आल्यानंतर मैत्रीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ऐश्वर्या झोपेतून उठली. तिला तिची वस्त्रे जरा ओलसर लागली. त्यामुळे तिने बाजूला पाहिलं, तर तिची मैत्रीण नव्याश्री रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत दिसली. तिचा गळा चिरण्यात आला होता. पश्चिम बंगळुरूच्या केंगरी शेजारील विश्वेश्वराय लेआऊट येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या ३१ वर्षीय पतीला अटक केली आहे. किरण असं त्याचं नाव असून तो टॅक्सीचालक आहे. ऐश्वर्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

नव्याश्री नृत्य दिग्दर्शिका होती. किरण आणि नव्याश्री यांचं तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. परंतु, त्यांच्यात काही कौटुंबिक वाद होते. नव्याश्रीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय किरणला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस म्हणाले, “घरातं एकटं राहणं नव्याश्रीला सुरक्षित वाटत नव्हतं. त्यामुळे तिने मंगळवारी सकाळीच तिची मैत्रीण ऐश्वर्या हिला घरी बोलावून घेतलं. कर्नाटकच्या शिवामोग्गा येथील या दोघी असून त्या बालपणीच्या मैत्रिणी आहेत.”

हेही वाचा >> Bengaluru Airport Murder : बंगळुरू विमानतळावर तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पत्नीबरोबर अफेअरचा संशय

मंगळवारी सायंकाळी नव्याश्री ऐश्वर्याला भेटली. त्यांनी अनिल नावाच्या त्यांच्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर ऐश्वर्या आणि नव्याश्री एका कारमधून बाहेर गेले. त्या अनिलला बाहेर भेटल्या. अनिलबरोबर त्यांनी नव्याश्रीची समस्या मांडली. त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर अनिलने तिला पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यांची चर्चा झाल्यानंतर ऐश्वर्या आणि नव्याश्रीने अनिलला त्याच्या घरी सोडलं आणि या दोघी नव्याश्रीच्या घरी रात्री साडेअकराच्या सुमारास परतल्या. घरी आल्यानंतर त्या एकाच बेडवर झोपल्या”, असं पोलीस म्हणाले.

दुसऱ्या चावीने केला घरात प्रवेश

सकाळी ऐश्वर्याला जाग आली तेव्हा नव्याश्रीचा मृत्यू झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नव्याश्रीचा मृतदेह पाहिल्यानंतर ऐश्वर्या जोरात किंचाळली त्यामुळे आजूबाजूचे शेजारी जमा झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना यासंदर्भात कळवलं. पोलीस म्हणाले की, “किरणकडे फ्लॅटची दुसरी चावीही होती. ऐश्वर्या आणि नव्याश्री घरी आल्यानंतर किरणने या चावीने घरात प्रवेश केला असेल आणि त्यानतंर नव्याश्रीची गळा चिरून हत्या केली असेल.”