Crime News in Uttarpradesh : उत्तर प्रदेशातील फारुखाबाद एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. जन्माष्टमीच्या कार्यक्रमात या दोन मुली सहभागी झाल्या होत्या. परंतु त्या परतल्याच नाहीत. आज सकाळी त्यांचा मृतदेह आंब्याच्या बागेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक फोन जप्त केला असून एका मुलीकडे एक सिमकार्डही सापडले आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी गेल्या अन् परतल्याच नाहीत
एका मुलीच्या वडिलांनी सांगितले की, “मुली जन्माष्टमीनिमित्त जवळच्या मंदिरात एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या संध्याकाळी गेल्या. रात्री ९ च्या सुमारास त्या घरी परतल्या. पण पुन्हा रात्री त्या घरातून गेल्या. मध्यरात्री एकच्या सुमारास कार्यक्रम संपला. परंतु तरीही त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचा शोध सुरू केला. आम्हाला आधी वाटलं की त्या तिथेच नातेवाईकांकडे राहिल्या असतील आणि सकाळी परततील.”
हत्या केल्याचा संशय
ते पुढे म्हणाले, सकाळी त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने बागेत झाडाला मृतदेह लटकत असल्याची माहिती दिली. सकाळी ६ च्या सुमारास आम्ही येथे पोहोचलो आणि मुलींना लटकलेल्या अवस्थेत पाहिलं. आम्हाला वाटते की कोणीतरी त्यांची हत्या केली असावी आणि त्यांचे मृतदेह झाडाला लटकवले असतील.”
Uttar Pradesh: Alok Priyadarshi, SP Fatehgarh, says, "This morning, we received information that two girls' bodies were found hanging from a tree near the village. A phone was also discovered at the scene, near the tree, along with clothing belonging to one of the girls. Details… pic.twitter.com/5k1HDb2FQQ
— IANS (@ians_india) August 27, 2024
शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा
जिल्हा पोलीस प्रमुख आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले की, दोन्ही मुली जवळच्या मैत्रिणी होत्या. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल. आम्हाला एक फोन आणि एक सिमकार्ड सापडले आहे. आम्ही माहिती गोळा करण्यासाठी आणि कुटुंबीयांशी बोलण्यासाठी त्यांचा वापर करत आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.
उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी त्वरीत या प्रकरणी तपासाची मागणी केली असून अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते.