इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांचा इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत इराणमध्ये शोक व्यक्त होतो आहे. लारिजानी यांच्यावर करण्यात आलेला हल्ला इस्रायल आणि अमेरिका यांची संयुक्त कारवाई होती. लारिजानी यांच्यासह त्यांचा मुलगा मुर्तजा लारिजानी, त्यांचे डेप्युटी अलीरेजा बयात आणि इतर सुरक्षा रक्षकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आता हा इशारा दिला आहे की लारिजानी यांच्या हत्येचा बदला आम्ही घेऊ. जे गुन्हेगार आहेत त्यांना रक्ताची किंमत मोजावी लागेल असंही मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे.
देवाचा सेवक देवाघरी गेला म्हणत लारिजानी यांना इराणकडून आदरांजली
इस्रायलने मंगळवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. सुरुवातीला हा दावा फेटाळल्यानंतर आता इराणने लारिजानी यांच्यासह जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचाही मृत्यू झाल्याच्या वृत्ताला इराणने दुजोरा दिला. अली लारिजानी यांच्या एक्स खात्यावरुन त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. लारिजानी यांनी ‘शहीद’ म्हणत ‘देवाचा सेवक देवाघरी गेला’, अशा शब्दात भावना व्यक्त करण्यात आल्या.
मोजतबा खामेनी काय म्हणाले?
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी लारिजानी यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. लारिजानी यांच्या गुन्हेगारांना सोडणार नाही. त्यांना या गोष्टीची किंमत त्यांच्या रक्ताने मोजावी लागेल असं मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे. दरम्यान इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनीही लारिजानी यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं आहे. लारिजानी हे माझे जवळचे सहकारी होते. त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार करण्यात आलं ही बाब निषेधार्ह आहे असंही मसूद यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
लारिजानी यांची हत्या हा इराणसाठी झटका
लारिजानी यांची हत्या हा इराणसाठी दुसरा मोठा झटका मानला जातो आहे. कारण इराणची सुरक्षा व्यवस्था आणि राजकारण या दोहोंमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. वेगवेगळ्या सत्ताकेंद्रांमध्ये त्यांनी संतुलन ठेवलं होतं असं म्हणत राष्ट्रपती मसूद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. इराण संसदेचे अध्यक्ष बाकिर कालिबफ यांनीही लारिजानी यांना आदरांजली वाहिली आहे. देशासाठी ते शहीद झाले, इराण ही गोष्ट कधीही विसरणार नाही असंही कालिबफ म्हणाले. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. २८ जानेवारीला अयातुल्ला खामेनी यांच्या घरावर आणि कार्यालयावर क्षेपणास्त्र डागत इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई केली होती. त्यानंतर आता लारिजानी यांचाही मृत्यू हल्ल्यात झाला आहे. हा संघर्ष यापुढेही तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
