पीटीआय, बंगळुरू

संयुक्त विरोधी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी द्रौपदी मुर्मू यांच्यासंदर्भात केलेल्या ‘नामधारी राष्ट्रपती’ (रबर स्टॅम्प प्रेसिडेंट) उल्लेखाबद्दल भाजपने सोमवारी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. सिन्हा यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व चिकमंगळूरचे आमदार सी. टी. रवी म्हणाले, की त्यांच्या विवेचनावरून एक आदिवासी स्त्री या पदासाठी सक्षम नसल्याचे त्यांना वाटत असल्याचे दिसते. यातून त्यांची ‘संकुचित मनोवृत्ती’ दिसून येते.

सिन्हा यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ‘नामधारी राष्ट्रपती’ (रबर स्टॅम्प) होणार नाही, याची ग्वाही देण्याचे आवाहन रविवारी केले होते. मुर्मू या ओडिशातील आदिवासी समाजातील आहेत. या संदर्भात रवी यांनी सांगितले, की देशाला ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती नक्कीच नको आहे. मात्र, स्वत:ला सिद्ध करणाऱ्या स्वावलंबी आदिवासी महिलेच्या क्षमतेविषयी प्रश्न उपस्थित करून, खोटा प्रचार करण्याची त्यांची मानसिकता धोकादायक आहे. सिन्हा यांची स्वत:लाच केवळ या पदासाठी पात्र समजण्याची मनोवृत्ती क्षुद्रच आहे.

मुर्मू यांनी झारखंडचे राज्यपालपद, ओडिशात मंत्रिपद आणि आमदारपद आणि एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे, असे सांगून रवी म्हणाले, की त्यांनी त्यांची क्षमता आपल्या कर्तृत्वातून आधीच सिद्ध केली आहे. ‘आदिवासी महिला’ या पदासाठी सक्षम नसल्याचे समजणे कोतेपणाचे लक्षण आहे.

 मुर्मू १० जुलै रोजी प्रचारार्थ कर्नाटकला येणार आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार १८ जुलैला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्हा रविवारी बंगळुरू येथे प्रचारार्थ आले असताना, त्यांनी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहून केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. सिन्हा म्हणाले होते, की राजकीय विरोधकांना गप्प बसवण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), प्राप्तिकर विभागांसारख्या सरकारी संस्थांचा गैरवापर केंद्र सरकार करत आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना रवी म्हणाले, की ‘ईडी’ किंवा प्राप्तिकर विभाग प्रामाणिक लोकांवर काही कारवाई करत नाही. परंतु भ्रष्टाचाऱ्यांना सोडत नसल्याने त्यांनी काळजी घ्यावी.  मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.