ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) तसेच पाकिस्तान यांनी काश्मीरमधील मानवी हक्कांचा मुद्दा संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाकडे उपस्थित केल्याबाबत भारताने टीका केली आहे. ओआयसी ही संघटना असहायतेतून पाकिस्तानकडून ओलिस ठेवली जात असून त्यांना काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यास भरीस पाडले जात आहे, असे भारताने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र मानवी हक्क मंडळाच्या ४८ व्या अधिवेशनात भारताने सांगितले, की पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असून अर्थपुरवठा व शस्त्रपुरवठाही करीत आहे. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केलेल्या काही व्यक्ती पाकिस्तानात आहेत. भारताच्या वतीने पाकिस्तान व ओआयसी यांना पवन बधे यांनी यांनी उत्तर दिले. ते जीनिव्हातील भारतीय दूतावासात भारताचे प्रथम सचिव आहेत. त्यांनी भारताचा उत्तराचा अधिकार वापरताना सांगितले,की पाकिस्तान व ओआयसी यांनी काश्मीर प्रश्नी उपस्थित केलेले मुद्दे अनाठायी असून दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरलेल्यांकडून आम्हाला काही शिकण्याची इच्छा नाही.

पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र असून मानवी हक्कांचे त्यांनी सर्वाधिक उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने अनेक मंचाचा उपयोग काश्मीर प्रश्न उपस्थित करण्यासाठी वेळोवेळी केला आहे. त्या माध्यमातून भारताविरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पाकिस्तानातील मानवी हक्कांच्या गंभीर उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानने काश्मीरमधील मानवी हक्कांचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय दिला असून भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाला पाकिस्तानकडून काही शिकण्याची गरज नाही, असे बधे यांनी सांगितले.