देशभरातील करोनाच्या रुग्णांनी ९ लाखांचा आकडा पार केला असून गेल्या चोवीस तासांमध्ये २८ हजार ४९८ रुग्णांची वाढ झाली. एकूण करोना रुग्णांची संख्या ९ लाख ६ हजार ७५२ इतकी झाली आहे. एकूण मृत्यू २३ हजार ७२७ झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ५५३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणात सातत्यपूर्ण वाढ झालेली आहे. २० राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. १० राज्यांमध्ये ते ७१ ते ८२ टक्क्यांपर्यंत आहे. उर्वरित १० राज्यांमध्ये ते ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

रुग्ण वाढीचा दर घसरणीला

भारताची लोकसंख्या जास्त असल्याने दररोज वाढणाऱ्या रुग्णांचे प्रत्यक्ष आकडेही जास्त दिसतात. त्यामुळे करोनाच्या परिस्थितीचे आकलन करताना गोंधळ होऊ शकतो. मात्र, रुग्णवाढीचा दर सातत्याने कमी होत आहे. देशभरात रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होऊन जात असलेल्या  रुग्णांची संख्या अधिक आहे. ३ लाख ११ हजार ५६५ रुग्ण उपचाराधीन असून ५ लाख ७१ हजार ४५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मे महिन्याच्या अखेपर्यंत उपचाराधीन रुग्णांची संख्या जास्त होती. जूनपासून हे प्रमाण कमी होत गेले आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा १.८ पटीने जास्त आहे. करोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने १० राज्यांमध्ये झालेला आहे. या राज्यांमध्ये ८६ टक्के करोना रुग्ण आहेत. महाराष्ट्र व तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये ५० टक्के रग्ण असून कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, गुजरात व आसाम या ८ राज्यांमध्ये ३६ टक्के रुग्ण आहेत. देशातील मृत्यूदर २.६० टक्क्यांवर आला आहे, असे भूषण यांनी सांगितले.

ही टाळेबंदी नव्हे!

नियंत्रित विभागांमध्ये सक्तीने नियम लागू केले नाही तर रुग्ण वाढतात. त्याचे प्रत्यंतर काही शहरांमध्ये वा जिल्ह्य़ांमध्ये दिसून आले आहे. काही ठिकाणी लोकांनीही नियम पाळले नाहीत. त्यामुळे पुन्हा नियंत्रित विभागांमध्ये लोकांवर निर्बंध लादले गेले. त्याचा संबंध टाळेबंदीशी जोडणे योग्य नसल्याचे भूषण म्हणाले.

जगभर करोनालसींवरील संशोधनाला वेग

रशियामध्ये लससंशोधनाचे सुरुवातीचे टप्पे यशस्वी झाले आहेत. रशियाने लससंशोधनाला वेग दिला आहे. त्याच प्रमाण चीन, अमेरिका यांनीदेखील संभाव्य लसींवरील संशोधन जलदगतीने करण्याचे ठरवले आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड लसही मानवी चाचणीसाठी वेगाने प्रयोग केले जात आहेत. भारतातही २ संभाव्य लसींचा प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाला असून त्यांना मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतानेही जगाबरोबर राहिले पाहिजे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. भारतातील यशस्वी लसनिर्मितीसाठी किती काळ लागेल हे मात्र भार्गव यांनी स्पष्ट केले नाही. ‘आयसीएमआर’ने १५ ऑगस्टपर्यंत लसनिर्मितीची अपेक्षा व्यक्त करणारे पत्र मानवी चाचणी घेणाऱ्या रुग्णालयांना लिहिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या रुग्णालयांमध्ये १ हजार जणांवर चाचण्या घेण्यात येणार आहेत.