सुकमा : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने  एके ४७ रायम्फलीने केलेल्या गोळीबारात  त्याचे चार सहकारी ठार झाले.  छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सोमवारी ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून पोलीस अधिकाऱ्यांना असे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

पहाटे सव्वातीन वाजता केंद्रीय राखीव दलाच्या मरायगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पन्नासाव्या  बटालियनच्या लिंगणपल्ली येथील छावणीत  हा प्रकार झाला. राजधानी रायपूरपासून हे ठिकाण  ४०० कि.मी अंतरावर आहे असे  बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार कॉन्स्टेबल रीतेश रंजन याने त्याच्या एके ४७ रायफलीतून गोळीबार केला. त्यात सात जवान जखमी झाले होते त्यांना भद्राचलम भागातील रुग्णालयात नेण्यात आले. हे ठिकाण तेलंगण राज्यात आहे. तेथे डॉक्टरांनी चार जणांना मृत घोषित केले. मरण पावलेल्यांमध्ये कॉन्स्टेबल राजमणी कुमार यादव, राजीब मोंडाल, धनजी, धर्मेद्र कुमार यांचा समावेश आहे. तीन जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या गोळीबारामागचा हेतू समजलेला नाही. त्याबाबत चौकशी चालू आहे. कॉन्स्टेबल रंजन याला अटक करण्यात आली आहे.

दोन जवानांना विमानाने रायपूरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मरण पावलेल्या जवानात तीन बिहारचे तर एक पश्चिम बंगालचा आहे.

काय घडले?

सुकमाचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी सांगितले की, रंजन हा पहाटे चार वाजता त्याला दिलेले काम करण्यासाठी तयार असणे अपेक्षित होते, पण त्याने त्याच्या बराकीत झोपलेल्या त्याच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. बराकीत त्यावेळी ४०-४५ जवान निद्रावस्थेत होते. रंजनच्या रायफलीतील गोळय़ा संपल्यानंतर गोळीबार थांबला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला पकडले. दोन-तीन दिवस रंजन व गोळीबारात मरण पावलेल्यांपैकी काही जण एकमेकांची थट्टामस्करी करीत होते. त्यावेळी कदाचित रंजनला काही आक्षेपार्ह बोलले गेले असू शकते. पण या घटनेमागचे कारण चौकशीनंतरच कळणार आहे.