वृत्तसंस्था/व्यापार प्रतिनिधी

शिकागो-मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तीव्र संघर्षामुळे जागतिक बाजारांत खनिज तेलाचे दर सोमवारी प्रतिबॅरल १२० डॉलरपर्यंत पोहोचले. याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारांत उमटले. मुंबई शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. रुपयाही आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

बाजारात अशी पडझड होत असताना देशाला इतक्यात महागाईचे चटके बसण्याची शक्यता नाही, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत केले. तेलाच्या किमतीत इतकी वाढ यापूर्वी रशियाने युक्रेनमध्ये हल्ला केल्यानंतर, २०२२ मध्ये झाली होती. शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात तीन टक्क्यांहून अधिक घसरण, तर रुपया ९२.३६ या विक्रमी नीचांकावर लोळण घेताना दिसून आला.

खनिज तेलाचा भडका

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीने प्रति पिंप ११९.५० डॉलरचा टप्पा सोमवारी गाठला. नंतर व्यवहारात त्या पिंपामागे ११२.९८ डॉलरपर्यंत खाली असल्या तरी, एका दिवसांत किमतीतील मोठी झेप जागतिक बाजारासाठी भीतीदायी ठरली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेलातील दरवाढीला फारसे महत्त्व दिलेले नाही. ते म्हणाले, ‘ही दरवाढ काही काळासाठी असेल. इराणकडून असलेला आण्विक धोका संपल्यानंतर हे दर उतरतील. अमेरिका, जागतिक सुरक्षा आणि शांततेसाठीची ही मोजावी लागणारी ही किरकोळ किंमत आहे.’

पश्चिम आशियातील ‘तेल’ लक्ष्य

इराणच्या हल्ल्यानंतर बहारीनच्या राष्ट्रीय तेलकंपनीने आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे. सर्व कंत्राटांतील बंधनांतून कंपनीला मुक्त करण्यात आल्याचे बहारीनने जाहीर केले. इस्रायलनेही तेहरानमधील तेलसाठ्यांना लक्ष्य केले होते. इराक, कुवेत, यूएई यांनीही तेलउत्पादनात घट केली आहे.

फटका कुणाला?

हार्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण असल्यामुळे जगातील एक पंचमांश तेलपुरवठा विस्कळीत झाला आहे. आशियातील तेलपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.इराण दिवसाला १६ लाख बॅरल तेलाची निर्यात करतो. त्यातील बहुतांश निर्यात चीनला होते. चीनने हे युद्ध तत्काळ थांबविण्याचे आवाहन केले आहे. यामुळे चीन इंधनपुरवठ्यासाठी इतर पर्याय शोधत आहे.

‘देशात महागाई वाढणार नाही’

नवी दिल्ली : ‘जगात कच्च्या तेलाचे भाव वाढत असले, तरी त्याचा देशांतर्गत महागाईवर फारसा परिणाम होणार नाही. भारतातील महागाईचा दर सध्या किमान पातळीवर आहे,’ असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी स्पष्ट केले. ‘पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडेपर्यंत गेले पूर्ण वर्षभर तेलाच्या किमती कमी होत्या. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर या किमती वाढल्या आहेत. मात्र, महागाई किमान पातळीवर असल्याने त्याचा फारसा परिणाम दिसणार नाही असे त्यांनी नमूद केले.

मोजताबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते

इराणने सर्वोच्च नेतेपदी आयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजताबा खामेनी (वय ५६) यांची निवड केली आहे. पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला असताना मोजताबा यांच्याकडे इराणची सूत्रे आली आहेत.

भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य – जयशंकर

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करणे, भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि ऊर्जा सुरक्षा तसेच, व्यापारासारख्या राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण करणे या तीन तत्त्वांवर भारताची भूमिका आधारलेली आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये स्पष्ट केले. आखातातील भारतीयांच्या अडचणींचा विचार करून संबंधित मंत्रालयांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

अन्य घडामोडी

– इराणबरोबरील युद्ध थांबविण्याचा निर्णय नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे वक्तव्य.
– रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इराणला पाठिंबा.
– यूएईमधील फुजैराहतील तेलसुविधा केंद्राला आग
– बहारीनमधील एकमेव असलेली तेलशुद्धीकरण कंपनी लक्ष्य
– शायबाह तेलक्षेत्राला लक्ष्य करणारे अनेक ड्रोन्स टिपल्याची सौदी अरेबियाची माहिती
– इराणमधील इस्फहान शहरावर हल्ले, लेबनॉनही लक्ष्य. इराणचे कुवेत, कतार, बहारीनमध्ये हल्ले.

साठेबाजी रोखण्यासाठी घरगुती एलपीजी सिलिंडर नोंदणीसाठी किमान प्रतीक्षा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जाणार नाहीत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.