वृत्तसंस्था, लंडन
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अधिक तीव्र होण्याच्या शक्यतेने गुरुवारी खनिज तेलाच्या दराचा भडका उडाला. आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी ‘ब्रेंट क्रूड’ पिंपामागे १२६.४१ डॉलरवर पोहोचले. ही मागील चार वर्षांतील म्हणजेच मार्च २०२२ नंतरची तेलाची सर्वोच्च दरपातळी आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीविरोधात इराणने लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिल्याने पश्चिम आशियातील परिस्थती पुन्हा चिघळण्याची शक्यता असून तेलाच्या दरात
आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. तेलाच्या दरवाढीचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आणि निर्देशांक जवळपास एका टक्क्याने गडगडले.
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून महिनाभरातच कच्च्या तेलाच्या किमती जवळपास दुपटीने वाढल्या आहेत. अमेरिका-इराण यांच्यात सध्या शस्त्रसंधी असला तरी होर्मूझ सामुद्रधुनीवरून दोन्ही देशांत तणाव सुरू आहे. इराणने होर्मूझ सामुद्रधुनी बंद केली असून अमेरिकेने नाकेबंदी सुरू केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर नव्याने हल्ले सुरू करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त ‘ॲक्सिऑस’ या वृत्तसंकेतस्थळाने बुधवारी रात्री दिले. त्याशिवाय अमेरिकेच्या नाकेबंदीविरोधात इराणने लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दोन्ही देशांतील वाढलेल्या तणावामुळे पश्चिम आशियातील परिस्थती आणखी चिघळण्याचा धोका वाढला आहे.
अमेरिकेने इराणवर लष्करी हल्ले करण्याची तयारी केल्याच्या बातम्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीपैकी २० टक्के व्यापार ज्या होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो, ती सध्या बंद असल्याने त्याचा तेल पुरवठ्यावर आणि किमतींवर मोठा परिणाम दिसून येत आहे. पश्चिम आशियातील युद्ध अधिक तीव्र होण्याच्या शक्येतेने तेलाच्या दरातील भडक्याचे जगभरातील भांडवली बाजारावरही विपरित सावट दिसून आले. खनिज तेल निर्यातदारांची संघटना ‘ओपेक’मधील फूट आणि संयुक्त अरब अमिरातीने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने बाजारात अस्थिरता वाढली आहे.
ब्रेंट क्रूडच्या किमती १२६ डॉलरपर्यंत जाऊन भिडल्या असल्या तरी, दिवसअखेर त्या काही प्रमाणात खाली येऊन ११६ डॉलरवर स्थिरावल्या. मात्र जोपर्यंत युद्धावर ठोस तोडगा निघत नाही किंवा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा वाहतुकीसाठी सुरू होत नाही, तोपर्यंत किमती चढ्याच राहतील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, किमतीतील वाढीची गती अशीच सुरू राहिल्यास तेलाचा भाव पिंपामागे १५० डॉलरपर्यंत जाऊ शकतो. युद्धाआधी या चिंचोळ्या खाडीमार्गातून दर दिवशी १२५ ते १४० ऊर्जा जहाजांची वाहतूक सुरू असे. तर गुरुवारी उपलब्ध तपशिलानुसार, मागील २४ तासात केवळ सात जहाजे या मार्गातून पुढे जाऊ शकली आहेत.
खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: ८० टक्के गरज आयातीद्वारे भागवल्या जाणार्या भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होतो, ज्यामुळे अन्नधान्य, प्लास्टिक आणि खतांच्या किमतीही वाढू शकतात.
