दुबई/वॉशिंग्टन : येमेनमधील हुती बंडखोरांनी तांबड्या समुद्रात सौदी अरेबियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर गुरुवारी जागतिक बाजारात खनिज तेलाच्या दराचा भडका उडाला. ‘ब्रेंट क्रूड’चे दर ५.८३ डॉलरने (६.२ टक्के) वाढून पिंपामागे १०० डॉलरच्या पार गेले. मे महिन्यानंतर खनिज तेलाने १०० डॉलरचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जागतिक तेल वाहतुकीतील, विशेषत: तांबडा समुद्र आणि होर्मुझची सामुद्रधुनी या मार्गांवरील अडथळे अधिक वाढण्याच्या शक्येतेने तेल दर तीव्रपणे वाढत उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरून सुरू असलेल्या संघर्षाव्यतिरिक्त, सौदी अरेबियातून होणार्‍या वाहतुकीवर सागरी नाकेबंदी येण्याच्या शक्यतेनंतर, येमेनमधील हुती बंडखोरांनी ‘बाब-अल-मंदेब’ सामुद्रधुनीमध्ये सौदी तेलाची वाहतूक करणार्‍या जहाजांना लक्ष्य करून संघर्षाची एक नवीन आघाडी उघडली. तेल पुरवठा साखळीतील दुसर्‍या महत्त्वाच्या मार्गावर अडथळे येण्याची चिंताजनक शक्यता बाजार गृहीत धरत आहे, असे ‘पेपरस्टोन’चे संशोधन रणनीतीकार अहमद असिरी यांनी सांगितले.

अमेरिकेच्या ‘वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट’ क्रूडच्या किमतीत ४.४१ डॉलरची म्हणजेच ५.०८ टक्क्यांची वाढ होऊन ते ९१.२४ डॉलरवर पोहोचले; ११ जूननंतर पहिल्यांदाच या तेलाचा भाव प्रतिपिंप ९० डॉलरवर गेला आहे. हुथी बंडखोरांनी एका लष्करी कारवाईदरम्यान सौदी अरेबियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याचे गुरुवारी जाहीर केले.

लाल समुद्रातून प्रवास करत असताना झालेल्या हल्ल्यामुळे यापैकी एक जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणने जहाजावर गोळीबार केल्यास प्रत्येक वेळी इराणचा पूल किंवा वीज प्रकल्प नष्ट करण्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासांतच, अमेरिकेच्या लष्कराने इराणवर सलग बाराव्या रात्री हल्ले सुरू ठेवले.