scorecardresearch

“आता ‘रिअल मास्टर’कडे जाण्याची वेळ..,” प्रशांत किशोर यांच्या ट्विटने वाढवलं गूढ

काँग्रेस पक्षासोबतची बोलणी फिसकटल्यानंतर प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट करून पुढे कोणतं पाऊल उचलणार याबाबत सूचक इशारा दिला आहे.

Prashant-Kishor
(File Photo)

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतर काँग्रेस पक्षासोबत त्यांची बोलणी फिसकटली आहे. बोलणी फिसकटल्यानंतर प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट करून पुढे कोणतं पाऊल उचलणार याबाबत सूचक इशारा दिला आहे. त्यांनी नवीन पक्ष काढण्याबाबत संकेत दिले आहेत.

प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “समस्या आणि सुशासन समजून घेण्यासाठी आता ‘रिअल मास्टर’ अर्थातच लोकांकडे जाण्याची वेळ आली आहे. याची सुरुवात बिहारपासून होणार.”

तथापि, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्टपणे काहीच सूचित केलं नाही. त्यामुळे ते नवीन राजकीय पक्ष सुरू करणार की विरोधी आघाडीत सामील होणार याबाबत आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. याबाबत अधिक माहिती देताना सूत्रांनी सांगितलं की, ‘प्रशांत किशोर यांनी सध्या राज्याचा दौरा करण्याची योजना आखली आहे. बिहारमधील सत्ताधारी भाजप-जनता दल युनायटेड युतीपासून ते दूरच राहण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांनी नितीश कुमार यांची भेट टाळली आहे.’

काँग्रेससोबतची बोलणी का फिसकटली?

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतची ऑफर नाकारल्याचं ट्विटरवर जाहीर केल्यानंतर, प्रशांत किशोर यांनी एका आठवड्याने हे ट्वीट केलं आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यरत असणाऱ्या कॉंग्रेस कमिटीचा सदस्य म्हणून बोर्डात येण्याबाबत कॉंग्रेसची ऑफर नाकारल्याची माहिती त्यांनी मागील ट्विटमधून दिली होती. काँग्रेसमध्ये मोठा बदल घडवून आणण्यासाठी त्यांना विशेष अधिकार पाहिजे होते. पण काँग्रेसने त्यांची मागणी अमान्य केली. त्यामुळे त्यांची बोलणी फिसकटली.

नवीन घोषणेनंतर आता ते बिहारमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला पुन्हा सुरुवात करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांनी चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांना जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. पण पक्षाअंतर्गत मतभेद झाल्यानंतर १६ महिन्यांत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cryptic tweet by prashant kishor said time to go at real master rmm

ताज्या बातम्या