Cuban Crisis: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ अस्त्र बाहेर काढत अनेक देशांना कोंडीत पकडले. अमेरिकेच्या शेजारी असलेल्या व्हेनेझुएला, क्युबा, मेक्सिको या देशांवरही त्यांनी निर्बंध लादले होते. क्युबाला त्यांनी काही दिवसांपूर्वी अखेरचा इशारा दिला होता. ‘क्युबाने खूप उशीर होण्यापूर्वी अमेरिकेशी करार करावा, अन्यथा त्यांचा तेल आणि पैशाचा पुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल’, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी इंधन पुरवठा बंद केला. यामुळे आता क्युबाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
क्युबामध्ये सध्या भीषण परिस्थिती आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबद्दलचे वृत्त दिले आहे. क्युबामधील इंधन पुरवठा संपत आल्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तसेच क्युबाचा पर्यटन व्यवसाय घटल्यामुळे परकीय चलनाचाही तुटवडा आता भासू लागला आहे.
पर्यटन व्यवसाय ठप्प
क्युबा या बेटावरील लोकसंख्या जवळपास एक कोटींच्या घरात आहे. विजेचा तुटवडा भासत असल्यामुळे अनेक शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर कार्यालय आणि उद्योगधंदेही बंद करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता पुरेसा इंधन साठा नसल्यामुळे रशिया आणि कॅनडा येथून येणारी विमाने रद्द झाली आहेत. पर्यटकांअभावी हॉटेल्सही बंद करावे लागत आहेत.
आरोग्य व्यवस्था कोलमडली, शहरात कचऱ्याचे ढीग
यूके आणि कॅनडाने त्यांच्या देशातील नागरिकांना क्युबामध्ये प्रवास करण्यासाठी मनाई आदेश जारी केले आहेत. मागच्याच आठवड्यात क्युबाला लाखो डॉलर्सचा वार्षिक महसूल मिळवून देऊ शकणारा हबानोस सिगार महोत्सवही रद्द करण्यात आला. सरकारी रुग्णालयांमधील सेवा बंद झाल्या आहेत. कचरा उचलणाऱ्या गाड्यांना इंधन नसल्यामुळे क्युबातील शहरांच्या चौका-चौकात कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे.
भीषण अन्न टंचाई
इंधन आणि ऊर्जेचा तुटवडा भासत असतानाच क्युबाला अन्न टंचाईचाही सामना करावा लागत आहे. क्युबामधील लोक जे खातात, त्यापैकी बहुसंख्य जिन्नस आयात केले जातात. बेटावरील सरकारच्या कृषीधोरणामुळे क्युबाला आयातीवर अवलंबून राहावे लागले होते. वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर क्युबन राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांनी जनतेला या अडचणींना कल्पकतेने तोंड द्यावे, असे आवाहन केले आहे. तसेच युद्धकाळातील मानसिकता स्वीकारा, असेही ते म्हणाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?
“क्युबाला आता तेलाचा एक थेंब किंवा एक डॉलरही मिळणार नाही. खूप उशीर होण्यापूर्वी क्युबाने अमेरिकेशी करार करावा”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले होते. दरम्यान, क्युबाच्या अध्यक्षांनी अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईवर टीका केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा इशारा दिला होता.

