देशातील राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील गोंधळाची मालिका थांबताना दिसत नाहीये. NEET आणि CBSE नंतर आता ‘क्युएट’ (CUET-UG) परीक्षेतही मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. यावरून विरोधकांनी मोदी सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘एक कोटी मुलांचे भविष्य धोक्यात’- विरोधकांचा घणाघात

आम आदमी पार्टीच्या नेत्या अतिशी यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत शिक्षण मंत्र्यांवर निशाणा साधला. “आधी NEET, मग CBSE आणि आता CUET. हा राष्ट्रीय परीक्षांचा निव्वळ गैरव्यवस्थापन आहे,” असा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सरकारला धारेवर धरले.

राहुल गांधी म्हणाले, “NEET, CBSE, SSC आणि आज CUET. चार परीक्षा, एक कोटी मुले, पण एकही परीक्षा प्रामाणिकपणे पार पडली नाही.”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत, “ज्या पिढीचे भविष्य तुम्ही बरबाद करत आहात, तीच पिढी तुम्हाला जाब विचारणार,” असा इशारा त्यांनी दिला.’आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी “देशाला सुशिक्षित पंतप्रधानांची गरज आहे,” अशी टिप्पणी केली.

परीक्षा केंद्रांवर गोंधळाचे वातावरण

३० मे २०२६ रोजी झालेल्या CUET परीक्षेच्या सकाळच्या सत्राला तांत्रिक कारणामुळे तब्बल दोन तास उशीर झाला. अनेक केंद्रांवर तासोनतास ताटकळत राहिल्यानंतर विद्यार्थ्यांना उशिरा सुरू होणार असल्याचे फलक पाहायला मिळाले. या विलंबाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये काही मोठा गैरप्रकार तर झाला नाही ना, अशी शंका ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच ३ मे रोजी झालेली NEET-UG परीक्षा पेपर फुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली असून, २१ जून रोजी २२ लाख विद्यार्थ्यांची पुनरपरीक्षा होणार आहे. तसेच कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेतही सर्व्हर क्रॅश आणि हायटेक कॉपीचे रॅकेट पकडले गेल्याने काही शिफ्ट्स रद्द कराव्या लागल्या होत्या.

NTA चे स्पष्टीकरण आणि नवीन वेळापत्रक

वाढता वाद पाहता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने तात्काळ स्पष्टीकरण जारी केले. एनटीएने या गोंधळासाठी त्यांची तांत्रिक भागीदार कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ TCS ला जबाबदार धरले आहे.

“TCS कडील तांत्रिक बिघाडामुळे ३० मे रोजी काही केंद्रांवर परीक्षा सुरू होण्यास उशीर झाला. मात्र, हा बिघाड नंतर दुरुस्त करण्यात आला. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना परीक्षेसाठी पूर्ण वेळ वाढवून देण्यात आला,” असे NTA ने सांगितले.

सकाळच्या सत्रातील विलंबाचा परिणाम दुपारच्या सत्रावरही झाला. दुपारच्या सत्राची वेळ बदलून ती दुपारी ३ ऐवजी ४ वाजता करण्यात आली आणि रिपोर्टिंग वेळ अडीच वाजता ठेवण्यात आली. NTA ने विद्यार्थी आणि पालकांची माफी मागितली असून, मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 91-11-40759000 आणि ईमेल cuet-ug@nta.ac.in जारी केला आहे.

काय आहे CUET परीक्षा?

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत २०२२ मध्ये ‘CUET’ परीक्षा सुरू करण्यात आली. केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांमध्ये पदवी प्रवेशासाठी ही एकच देशपातळीवरील परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा ११ मे ते ३१ मे दरम्यान विविध टप्प्यांत आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या ताज्या गोंधळामुळे NTA च्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.